'या' कारणातही पुण्यातले आयटीयन्स ठरले अव्वल

सुधीर साबळे
मंगळवार, 19 मे 2020

  • पुण्यातले आयटीयन्स अव्वल, त्याखालोखाल ठाणे, मुंबई आणि नाशिकचा नंबर

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी अनेक कंपन्यांकडून विविध प्रकारची कारणे पुढे करत पगार कपातीपासून ते कामावरून कमी करण्यापर्यंतच्या समस्यांचा सामना आयटीयन्सना करावा लागत आहे. आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात कामगार आयुक्‍तांकडे तक्रारी नोंदवण्यामध्ये सध्या पुण्यातील आयटीयन्स अव्वल ठरले असून, दुसऱ्या स्थानावर ठाणे, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि चौथ्या क्रमांकावर नाशिकमधील आयटीयन्स असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातल्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामगारांसाठी असणाऱ्या कायद्यांबाबत अधिक सजग आहेत. आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांशी ते जोडले गेलेले आहेत. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची अन्यायकारक घटना घडली, की ही मंडळी तत्काळ कामगार संघटनांकडे धाव घेत त्यासंदर्भात मार्गदर्शनाची मागणी करतात. त्यामुळे की काय पुण्यामध्ये कामगार आयुक्‍तांकडे तक्रार नोंदवण्यात आयटीयन्स पुढे आहेत. त्याखालोखाल ठाणे, मुंबईमधील आयटीयन्सचा नंबर येतो. काही दिवसांपूर्वी नाशिकमधून देखील तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पुण्यापाठोपाठ आता राज्याच्या विविध भागांमधे काम करणारे आयटी कर्मचाऱ्यामध्ये जागरुकता आली असल्याचे राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजीत माने यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत आयटीयन्सकडून आलेल्या तक्रारींमध्ये कामावरून कमी करणे, पगार थकीत ठेवणे, पगार कमी करणे अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण प्रत्येकी 30 टक्‍यांपर्यंत राहिले आहे. याखेरीज रजा घेण्याची सक्‍ती करणे आणि नव्या नोकरीच्या ठिकाणी नियुक्‍ती न देण्याच्या तक्रारींचे प्रमाण हे प्रत्येकी 20 ते 25 टक्‍यांपर्यंत राहिल्याचे माने यांनी सांगितले. दरम्यान, आयटी कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येत असून, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे त्याची नोंद करण्यात येत आहे. आयटीयन्सकडून कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात पाठपुरवठा सुरू असल्याचे माने यांनी नमूद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about it empolyees of pune and hinjewadi it park