राज्य सरकारची परवानगी मिळूनही पिंपरीतील क्रीडा संकुले बंद राहण्याचं हे कारण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

शहरातील क्रीडा संकुले, मैदाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

पिंपरी : शहरातील क्रीडा संकुले, मैदाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महापालिकेच्या क्रीडा विभागाने जलतरण तलावांसह सर्व क्रीडा संकुले, मैदाने तूर्तास बंदच ठेवली आहेत. त्यामुळे खेळाडू, व्यायाम आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना त्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम, मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडियम, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल, निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान यासह 12 बहुद्देशीय मैदाने आहेत. या शिवाय जवळपास 12 जलतरण तलाव, 4 स्केटिंग रिंक, 6 लॉन टेनिस कोर्ट आणि 14 बॅडमिंटन हॉल आहेत. यापैकी अनेक क्रीडा सुविधांचे ऑनलाईन बुकींग घेतले जाते. सध्या कै. मगर स्टेडियमच्या पुर्नविकासाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादृष्टीने त्याची प्रेक्षक गॅलरी पाडण्यात आली. तर नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या मैदानाचे खराब पॉलिग्रास मॅट काढून तेथे टर्फ टाकण्यास सुरुवात झाली होती. मात्र, टाळेबंदीमुळे सध्या ही दोन्ही कामे बंद ठेवण्यात आली आहेत. याखेरीज, काही क्रीडा मैदानांवर पालिकेकडून भाजी मंडई केंद्रे सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे देखील मैदाने खेळाडूंना उपलब्ध करणे अशक्‍य झाले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खोत म्हणाले, "राज्य सरकारने क्रीडा संकुले, मैदाने काही अटी-शर्तीवर खुली करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, याठिकाणी वैयक्तिक व्यायाम प्रकार किंवा एकट्याने खेळण्याचे खेळ उदा. दोरीवरच्या उड्या, योगासने इत्यादींना मुभा आहे. प्रेक्षक, सामूहिक खेळ आणि खेळाचे साहित्य एकापेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळण्याचे सर्व खेळ यांना परवानगी नाही. त्यामुळे क्रिकेट, फुटबॉल, जलतरण, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रीडा संकुले, मैदाने खुली केल्यावर गर्दी होऊ शकते. हे लक्षात घेऊन आम्ही त्यावरील निर्बंध कायम ठेवले असून, तूर्तास सर्व क्रीडा संकुले, मैदाने खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिकांसाठी बंद राहतील.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about sports comlex, sports ground at pimpri chinchwad city