Video : घरी व्यायाम करणाऱ्या मल्लांना भासतेय याची उणीव...

Video : घरी व्यायाम करणाऱ्या मल्लांना भासतेय याची उणीव...

पिंपरी :  तालमीत अथवा क्रीडा संकुलातील दररोजचा सराव बंद झाल्याने बहुतेक मल्लांचा घरीच व्यायाम सुरू आहे. मात्र, गादीवरील लढतीचा अभाव आणि खेळावर हुकूमत गाजविण्यासाठी वस्तादांच्या गुरुमंत्राची उणीव बहुतेक मल्लांना भासत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर हे निरनिराळ्या गावे, वाड्या-वस्त्यांचे बनले आहे. त्यामुळे अनेक गावांना कुस्त्यांची परंपरा राहिली आहे. काळाच्या ओघात अनेक तालमी ओस पडल्या आहेत. मात्र, काही तालमींकडून कुस्ती अजूनही आवडीने जोपासली जात आहे. काही मल्ल शहराबाहेरील कुस्ती संकुलात सराव करतात. परंतु, टाळेबंदीमुळे बहुतेक जण आपापल्या घरी परतले आहेत. त्यांना पूर्वीसारखा लढतींचा सराव करता येत नाही. मात्र, दररोजचा व्यायाम त्यांनी चालूच ठेवला आहे. 

मोशी येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ९२ किलो वजन गटामधील रौप्य पदक विजेता पै. प्रसाद सस्ते म्हणाला, "मागील १३ वर्षांपासून मी तालीम करत आहे. कात्रज येथील कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मात्र, टाळेबंदीमुळे सध्या घरीच आहे. पहाटे पाच वाजता उठल्यावर घरामागील मैदानावर धावतो. त्यानंतर गावाच्या तालमीत भावांबरोबर सराव करतो. मात्र, संकुलाप्रमाणे चांगला सराव होत नाही. गादीवरच्या सरावाची उणीव भासते."

Video : 'कोरोनामुळे मरण्यापेक्षा पिऊन जगू द्या...'
        
 चऱ्होली गावचा पै. योगेश्वर तापकीर म्हणाला, "मागील चार वर्षांपासून दिल्ली येथील महाबली सतपाल यांच्या छत्रसाल आखाड्यात कुस्ती शिकतो. मात्र, टाळेबंदी जाहीर झाल्यापासून घरीच आहे. आमच्या गावात तालीम नाही. जोर, बैठका, सपाट्या, धावणे असा व्यायाम घरीच करत आहे. परंतु, वस्तादांकडून शिकविले जात असल्याच्या खेळाचे डावपेच, तंत्र, आणि लढतीचा सराव याची उणीव जाणवते."

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गावडे म्हणाले, "शहर परिसरात जवळपास सात ते आठ तालमी सक्रीय आहेत. त्यामधून सुमारे सव्वाशे मल्ल सराव करतात. काही तालमीत नव्याने खेळाडू तयार होत आहेत. सुमारे ५० खेळाडू बाहेरच्या कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. सध्याच्या टाळेबंदीमुळे त्यातील बहुतेक मल्लांना गादीवरील लढतीपासून वंचित राहावे लागत आहे."

या तालमीत घडतात मल्ल... 

भवानी तालीम (भोसरी), गांधी पेठ (चिंचवड गाव), श्री भैरवनाथ, माळी आळी (पिंपरी गाव), एचए तालीम (पिंपरी), भैरवनाथ (रहाटणी) आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com