
विवाहसोहळ्यांमधील डामडौल झाला कमी
पिंपरी - कोरोना नंतरच्या काळात सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी विवाह सोहळ्यातील डामडौलला फाटा दिला आहे. बॅंड, घोडा, वाजंत्री हे पारंपरिक रिवाज कायम ठेवून डीजे व डॉल्बी सिस्टीम वगळली गेला आहे. तसेच, महागड्या लग्नपत्रिका, प्रचंड बस्ता, मोठ्या जेवणावळी, बूफे डिनर नको असाच सूर साऱ्यांचा असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कोरोनाच्या दोन वर्ष काळात अनेक निर्बंधांमुळे विवाह सोहळे अतिशय साधेपणाने झाले. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्स, प्रिंटर, बॅंड, वाजंत्री, डीजे व डॉल्बी, केटरर्स, फोटोग्राफी अशा साऱ्यांचा व्यवसाय झोपला. आता कोरोना काळ संपला असला तरी लोकांनी उधळपट्टी नकोच हे अंगीकारले आहे. बहुतांश कुटुंबे स्वतंत्रपणे साखरपुडा, सुपारी व हळदी, मेंहंदीचे कार्यक्रम न करता एकत्रितच सर्व कार्यक्रमांचे नियोजन करू लागले आहेत. साध्या पद्धतीने जेवण, नियमित वापरता येतील अशा साड्या व पोशाखाची खरेदी, आहेर किंवा भेट वस्तूंना नकार असतो.
यांची मागणी घटली
लेझीम, पंजाबी भांगडा, हलगी ग्रुप, तुतारी, सनई, चौघडा, सेट, डीजे, डॉल्बी, डेकोरेशन, वेलकम गर्ल, डान्सिंग व जंपिंग मिकी माउस.
बूफे डिनर तर गायबच झाला आहे. साधे जेवणाला पसंती दिली जात आहेत. बॅंक्वेट हॉलला काही प्रमाणात जागा कमी असल्याने त्या ठिकाणी बूफे डिनर सुरु आहेत. मात्र, साध्या व पारंपारिक चालिरीती पद्धतीवर मोठ्या प्रमाणात भर आहे. डीजे आणि बॅंड तर अजूनही मागितला जात नाही. घोडा देखील काहीजण आता नको म्हणतायेत. ट्रान्स्पोर्ट खर्च वाढला आहे.
- किरण बोडके, केटरर्स व्यावसायिक, रहाटणी
लोकांना विवाह सोहळ्यातील प्रत्येक वस्तू स्वस्तात हवी आहे. आधी १५ हजारात आम्ही बॅंड आणि घोडा देत असू. आता दहा हजारात द्यावा लागत आहे. तर, बग्गीला वेगळे पैसे घेत असू. लांब अंतरावर त्याचा दर ठरवायचो. आता मात्र, कोठेही नेले तरी एकच दर सुरु आहे. घोड्याला भुसा आणि कुट्टीचा खर्च करणे परवडत नाही. मनुष्यबळावर खर्च करणे परवडेनासे झाले आहे.
- अमीर मुनीर शेख, डांगे चौक
सर्वसाधारण दर
आधीचे दर सध्याचे दर
घोडा २५०० १५००
बग्गी १५००० १००००
घोडी ५००० २५००
उंट २००० १५००
बॅंड १५००० १००००
Web Title: Marriage Event Expenditure Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..