
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या मावळ तालुक्यात हौसेला मोल नसते. बारशापासून बाराव्यापर्यंत आणि उद्घाटनापासून खरेदीपर्यंत पैशांचा चुराडा केला जातो. मात्र, कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीमुळे लोकांनी स्वत:हून लाखोंचा खर्च काही हजारांवर आणला आहे. लॉकडाउनमुळे खोळंबलेले विवाहसोहळे आता पन्नास ते शंभर जणांच्या उपस्थितीत पार पाडले आहेत. अशा पद्धतीने गेल्या दोन महिन्यांत पाच हजार सोहळे पन्नास ते सत्तर हजार खर्चात पार पडले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काही महिन्यांपूर्वीपर्यंत सोहळ्यासाठी होणारी प्रचंड गर्दी, व्हीआयपी पाहुणे, हजारोंची संख्या, वाहतूक कोंडी, मान सन्मान, सत्कार समारंभ असे चित्र सर्वत्र होते. खिशात खुळखुळणारा पैसा, ईर्षा आणि गर्दीवरून "इमेज' ठरवण्याची पद्धत रूढ झाली होती. ती कोरोनामुळे संपुष्टात आली. कारण साथरोग अधिनियम 1987 अंतर्गत कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात काटेकोर नियम अमलात आणले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात फौजदारी दंड संहिता कलम 1973 (1),(3) प्रमाणे जमावबंदी व संचारबंदीचे नियम लागू केलेले आहेत. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यास 188 प्रमाणे नोटिसाही पोलिसांकडून बजावल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महापालिका अतिरिक्त आयुक्त, जनसंपर्क अधिकारी व पोलिसांचे मिळून क्षेत्रीय स्तरावर एक पथक तैनात केले आहे. हे पथक मंगल कार्यालये, हॉटेल, सभागृह अशा ठिकाणी जाऊन गर्दी दिसल्यास कारवाई करते. गर्दी झाल्यास काही नागरिक शंभर नंबरला कॉल करून तक्रारी करतात. याचीही दखल पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे नागरिक जागरूक झाल्याचे दिसून आले आहे.
हे आहेत नियम
सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत लग्नसोहळे पार पाडणे आवश्यक आहे. विवाहाला केवळ 50 व्यक्तींची उपस्थिती हवी. नागरिकांनी सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे तसेच त्याअनुषंगाने इतर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याबाबत अर्जदार जबाबदार आहेत. परवानगी केवळ सोहळ्याच्या दिवसापुरतीच मर्यादित आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये दंड आहे.
कार्यालयांचे पॅकेज
सध्या मंगल कार्यालयांची जागा मोठी असल्याने पॅकेज स्वरूपात लॉन न देता हॉल भाड्याने दिले जात आहेत. सर्व सुविधा एकाच जागी पुरविण्यात येत आहेत. कार्यालयांना 18 टक्के जीएसटी लागू आहे. इतर खर्च परवडत नसल्याने मदतनीस ही कमी आहेत. देखभाल दुरुस्ती खर्च ही वेगळा आहे.
- किरण बोडके, काळेवाडी फाटा, थेरगाव
बॅंक्वेट हॉलला पसंती
शहरात थाटामाटात होणारे विवाह सोहळे आता बॅंक्वेट (मेजवानी) हॉलमध्ये पार पडू लागले आहेत. मोजक्या लोकांमध्ये अगदी सुस्थितीत वातानुकूलित ठिकाणी हे सोहळे सोशल डिस्टन्स ठेवून होत आहेत. केटरर्ससह, डेकोरेशन व बैठक व्यवस्था कमी किमतीत मिळत असल्याने स्थानिक गाववाले व नागरिकांचीही याला पसंती मिळू लागली आहे. शहरात मोजक्याच ठिकाणी चांगले हॉल आहेत. ते काही हॉटेलसोबत तर काही लॉनमध्ये आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना प्रशस्त मंगल कार्यालयाचे भाडे पेलवत नसल्याने हॉलकडे वळू लागले आहेत. बऱ्याच जणांना या बॅंक्वेट हॉलचे पॅकेज मिळत आहे. एसी व नॉन एसी असेही प्रकार यामध्ये आहेत. सुसज्ज बैठक व्यवस्थेसह मास्क व सॅनिटायजर एकाच जागी पुरविले जात आहे. या हॉलच्या किमती सर्व सुविधांसह मिळून पन्नास ते सत्तर हजारांपर्यंत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बॅंक्वेट हॉलची किंमत सोईस्कर आहे. सोशल डिस्टन्ससाठी जागाही भरपूर मिळते. लग्न ही सुरळीत पद्धतीने पार पडतात. नागरिकांना हव्या त्या सर्व सुविधा मिळतात. डिसेंबरचे बुकिंग फूल आहे.
- राहुल गावडे, रागा हॉल, रावेत
सर्वांचे पैसे वाचत आहेत. त्याचबरोबर वातानुकूलित सुविधा मिळत आहे. साठ ते सत्तर हजारांत सर्व सुविधा मिळतात. शिवाय स्पेशल ऑर्डर प्रमाणे मागण्या पुरविल्या जातात. पाचही ठिकाणी सध्या आमचे हॉल बुकिंग सुरू आहे.
- अमित फटांगरे, सिझन्स हॉल, आकुर्डी व यमुनानगर
सध्या हॉलला मागणी आहे. मार्चपर्यंत बुकिंग सुरू आहे. सर्व जागा उपयोगी पडते. नागरिकांनाही खर्च परवडतो. शिवाय हॉलचे सौंदर्य व नियोजन व्यवस्थाही छान असते. त्यामुळे लोकांना भावते.
- सुमीत बाबर, बर्ड व्हॅली हॉल, वाकड व पिंपळेसौदागर
या आहेत सुविधा
सॅनिटायझर मास्कसह, केटरर्स, भटजी, सोहळ्याचा सर्व सेटअप
कमी कालावधीसाठी फायदेशीर