मार्क्सवादामुळे देशाची संस्कृती नष्ट; गिरीश प्रभुणे यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

ललित, कथा, काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

पिंपरी : ‘‘कोणी कितीही कट्टर विरोधक असला तरी संवाद हा परिवर्तनाचा सेतू असतो. त्यामुळे सर्व विचारधारांशी सुसंवाद साधला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आचार, विचारांच्या मुशीतून मी घडलो, जगलो आणि काम केले. मेकॉले आणि मार्क्सवाद यांनी आपल्या देशाची संस्कृती नष्ट केली आहे. पुन्हा समृद्ध भारताचा सुवर्णकाळ अनुभवायचा असेल तर आपले पारंपरिक ज्ञान, कलाकौशल्ये पुन्हा रुजवणे याला पर्याय नाही,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त पद्मश्री प्राप्त प्रभुणे आणि अरुंधती प्रभुणे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, पिंपरी-चिंचवड जिल्हा सहसंघचालक विनोद बन्सल, ग्रंथालयाचे कार्यवाह प्रदीप पाटील उपस्थित होते. यवतमाळ येथील ओंकार राष्ट्रदेव सार्वजनिक वाचनालय आणि ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय डाळिंब, तालुका दौंड येथील ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यात आले. विश्वास करंदीकर, चंद्रशेखर जोशी आणि आनंद रायचूर यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून प्रभुणे दांपत्याची अर्धशतकी प्रेरणादायी वाटचाल श्रोत्यांसमोर उलगडत गेली. शिशूवयात झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे संस्कार, विद्यार्थिदशेत लागलेले वाचनाचे प्रचंड वेड अन् त्यातून दोन-तीन वेळा घर सोडून जाण्याची ऊर्मी, भटक्या-विमुक्त जमातीत भेटलेले मित्र आणि त्यांचा सखोल प्रभाव कथन करताना प्रभुणे यांनी संघप्रचारक म्हणून आलेले अनुभव, अरुंधती यांच्याशी झालेला प्रेमविवाह त्यानंतर चिंचवड येथे दहा बाय पंधरा फुटांच्या गळक्या खोलीत तीन मुले, पंधरा-वीस कुटुंबीय अन् पै-पाहुणे यांतून झालेली प्रापंचिक ओढगस्त शिवाय ‘असिधारा’ हे नियतकालिक चालविल्यामुळे आलेला कर्जबाजारीपणा, झालेली मारहाण कथन केली. अरुंधती प्रभुणे यांनी, बालपणापासून मोठ्या कुटुंबात वावरल्याने शिक्षिकेची नोकरी करून प्रपंचातील कष्ट आनंदाने सहन केले, असे नम्रपणे नमूद करून आपली समर्पित वृत्ती प्रकट केली. विनिता ऐनापुरे, अश्विनी रानडे, अपर्णा देशपांडे आणि रमेश वाकनीस यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विनीत दाते यांनी सूत्रसंचालन केले; सतीश सखदेव यांनी आभार मानले. 

राजेंद्र पाटलांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

ललित, कथा, काव्यलेखन स्पर्धेतील विजेते 
ललितलेखन : प्रथम माधवी पोतदार, द्वितीय वंदना गुर्जर, तृतीय पुष्पा नगरकर, उत्तेजनार्थ सुनंदा जप्तीवाले. 
कथालेखन : प्रथम माधुरी विधाटे, द्वितीय अर्चना वर्टीकर, तृतीय उल्का खळदकर, उत्तेजनार्थ जयश्री पाटील. 
काव्यलेखन : प्रथम योगेश उगले, द्वितीय सुरेखा हिरवे, तृतीय सुरेश से, उत्तेजनार्थ प्रकाश परदेशी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marxism destroys the culture of the country said that girish prabhune