तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला?, मावळ भाजपचा आमदार शेळके यांच्यावर पलटवार

तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला?, मावळ भाजपचा आमदार शेळके यांच्यावर पलटवार

वडगाव मावळ (पुणे) : "तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला, याची मावळच्या जनतेला पूर्ण कल्पना आहे. मावळचे आमदार शेतकऱ्यांसोबत की पवना जलवाहिनीचे प्रवर्तक असलेल्या उपमुख्यमंत्रांसोबत हे त्यांनी प्रथम स्पष्ट करावे," असा पलटवार मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने आमदार सुनील शेळके यांच्यावर केला आहे. 

मावळातील भाजपच्या पुढाऱ्यांनी 'पवना जलवाहिनीबाबत त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावे', अशी टीका आमदार शेळके यांनी केली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या टीकेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनावेळी मावळचे विद्यमान आमदार जलवाहिनीविरोधी कार्यकर्ते होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होते व अजित पवार उपमुख्यमंत्री होते. 

आज राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत. विद्यमान आमदारांना खरोखरच मावळच्या शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर त्यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द केल्याचा शासन आदेश आणून त्यांना निवडून दिलेल्या मावळच्या जनतेला दाखवावा. मावळ तालुक्यातील नागरिक त्यांचे जाहिरपणे स्वागत करतील व मावळ भाजप त्यांचा जाहीरपणे सत्कार करेल. त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी मावळमधील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. ते स्वतः प्रकल्पाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे जनतेसमोर जाहीर करावे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मावळ तालुक्यातील भारतीय किसान संघ, भाजप, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय या पक्षांसोबतच तालुक्यातील जनतेचाही पवना बंदिस्त जलवाहिनीला कडाडून विरोध आहे. महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठ्यासाठी गहुंजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलावे. परंतु, थेट धरणातून बंदिस्त पाईपद्वारे पाणी उचलण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 
पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व जखमी आंदोलकांना न विसरता त्यांनी पवनेच्या पाण्यासाठी दिलेले बलिदान मावळवासीय वाया जाऊ देणार नाही, याची जाणीव विद्यमान आमदारांनी ठेवावी.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या कुठल्याही तालुका अथवा राज्य पातळीवरील पत्राची  अपेक्षा न ठेवता हा प्रकल्प रद्द करून घ्यावा. भाजपच्या परवानगीची आवश्यकता ठेवू नये. मावळ भाजप व तालुक्यातील नागरिक प्रकल्पाला कधीही समर्थन करणार नाही. आमची भूमिका कालही हीच होती. आजही तीच आहे आणि उद्याही अशीच राहणार आहे. विद्यमान आमदारांनी प्रथमता त्यांची भूमिका स्पष्ट करावी की ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामध्ये भाष्य करत आहेत की मावळच्या जनतेबरोबर प्रकल्पाला विरोध करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com