मावळातील गुलाब यंदा बहरलाच नाही

रामदास वाडेकर
Sunday, 14 February 2021

‘व्हॅलेंटाइन डे’ला जगभरात भाव खाणारा मावळातील गुलाब यंदा बहरलाच नाही. कोरोना अन्‌ त्यामुळे झालेले लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, शेतकरी आंदोलनाचा फटका गुलाब निर्यातदार शेतकऱ्यांना सोसावा लागला. दरवर्षीच्या तुलनेने यंदा परदेशी निर्यातीत मोठी घट झाली.

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ व वातावरणाचा परिणाम; निर्यातीत मोठी घट
कामशेत - ‘व्हॅलेंटाइन डे’ला जगभरात भाव खाणारा मावळातील गुलाब यंदा बहरलाच नाही. कोरोना अन्‌ त्यामुळे झालेले लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, शेतकरी आंदोलनाचा फटका गुलाब निर्यातदार शेतकऱ्यांना सोसावा लागला. दरवर्षीच्या तुलनेने यंदा परदेशी निर्यातीत मोठी घट झाली.

लॉकडाउन झाले आणि फुलांची निर्यात थांबली. परिणामी सुमारे दोनशे एकरावर गुलाबाची शेती संपुष्टात आली. सुमारे बाराशे एकरावर मावळात गुलाबाची शेती बहरली आहे. त्यापैकी दोनशे एकरावर शेतकऱ्यांनी मागणीअभावी उत्पन्न घेण्याचे बंद केले. यंदा निसर्ग व कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मावळातील फूल उत्पादक शेतकऱ्याला बोचरी थंडी भावलीच नाही. थंडीचे प्रमाण घटल्याने दहा दिवसआधीच फूल काढणी आली. मागणीपूर्वीच हंगाम आल्याने त्याचाही परिणाम निर्यातीवर झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नव्वदच्या दशकात मावळात ओरिएंटल ही बेलजजवळ पहिली कार्पोरेट गुलाबाची शेती करणारी कंपनी आली. त्याच दरम्यान डेक्कन फ्लोरा, सोएक्‍स, नेहा, एसी ॲग्रो, विक्रम ग्रीनटेक, एस्सार फ्लोरा यासारख्या अनेक कार्पोरेट फूल उत्पादक कंपन्यांनी मावळात पाय रोवले. तेव्हापासून मावळातील गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’ला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला. तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातही फ्लोरिकल्चरल पार्क उभा राहिला. येथून स्थानिक बाजारपेठेसह परदेशात गुलाब पोचला. 

Corona Update - पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा कोरोनाची धास्ती; 24 तासांत शंभरहून अधिक रुग्णांची भर

त्यामुळे मावळात फुलशेती बहरू लागली, याच कार्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी फुलशेतीचे अत्यावश्‍यक प्रशिक्षण घेऊन कामांतील अनुभवातून स्वतःच गुलाबाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. नॅशनल हॉर्टिकल्चरल बोर्डाकडून या शेतीसाठी सुरुवातीला २० टक्के; तर त्यापाठोपाठ ५० टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळू लागले. अनेक बॅंकांनी यासाठी पतपुरवठा केला. आज खेडोपाडी सर्वसामान्य शेतकरीही पॉलिहाऊसमध्ये जगात निर्यात होईल, अशा गुलाबाचे उत्पन्न घेत आहेत. जगभरात मोठी मागणी असणाऱ्या गुलाबाला यंदा स्थानिक पातळीवरील बाजारपेठेतच स्पर्धा वाढली आहे.  

आता राहुल गांधींनी लग्न करावे; 'हम दो हमारे दो' स्लोगनवर आठवलेंचा मास्टर स्ट्रोक

पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर म्हणाले, ‘भारतात गुलाबाला मागणी असणारी दिल्ली ही मोठी बाजारपेठ आहे. येथे सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याचा परिणाम फुलाच्या विक्रीवर झाला आहे. दिल्लीत येणारी फुले मुंबई, पुणे, कोलकता यासारख्या बाजारपेठेत आली. साहजिकच तेथे मागणीपेक्षा अधिक आवक झाल्याने बाजारभाव पडले. परदेशात दरवर्षी १८ ते २० रुपयाला जाणारे गुलाब यंदा १० ते १२ रुपये दराने विकले जात आहे.’’ 

किवळेतील फूल उत्पादक शेतकरी विकास पिंगळे म्हणाले, ‘‘कोरोना व त्यापाठोपाठ निसर्गचक्री वादळ, वातावरणातील बदल, अनियमित पाऊस याचा फूल उत्पन्नावर परिणाम झाला. यंदा बाजारपेठेत मागणी घटली. त्यामुळे आर्थिक उत्पन्न घटले.’

पिंपरी : दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी देत टोळक्‍याने कोयते भिरकावत माजविली दहशत

यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’ला कोरोनाची पार्श्‍वभूमी आहे, त्यामुळे फुलांची मागणी घटली. निर्यातीवरील विमान भाडे वाढले आहे, तसेच विमान फेऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत निर्यातीत घट झाली आहे.
- डॉ. भास्कर पाटील, संचालक, राष्ट्रीय सुगी पश्‍चात तंत्रज्ञान संस्था

कोरोनामुळे फूल शेती मेटाकुटीला आली आहे. त्यात निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला. 
- सोमनाथ तांबे, फूल उत्पादक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval rose did not bloom this year