मावळातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी प्रथमच तळेगावात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

  • तळेगावात होणार प्रथमच मतमोजणी
  • मावळ तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या ठिकाणात बदल

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था येथील महसूल भवनात केली आहे. मात्र, मतदानाचे साहित्य वाटप व मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच मतमोजणीची प्रक्रिया तळेगाव येथे होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्‍यातील इंगळूण, कांब्रे नामा, गोवित्री, कुसवली, आंबेगाव, माळवाडी, नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रूक, वेहेरगाव, ताजे, मळवली, कार्ला, तिकोना, कोथुर्णे, येलघोळ, बऊर, करंजगाव, साई, चिखलसे, टाकवे बुद्रूक, खांड, घोणशेत, आढे, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, दारुंब्रे, कुसगाव बुद्रूक, खडकाळा, येळसे, कशाळ, साते, आपटी, खांडशी, पाटण, वारू, शिवली, मळवंडी ठुले, अजिवली, मोरवे, थुगाव, शिवणे, महागाव, उकसाण, डाहूली, शिरदे, कुसगाव खुर्द, नाणे, वडेश्‍वर, धामणे, आढले खुर्द, 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऊर्से, गहुंजे, सांगवडे, आंबी, कुसगाव पमा, कुरवंडे या ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेला सुरुवात झाली. ३० डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था येथील महसूल भवनात तसेच, भवनाच्या प्रांगणात घातलेल्या मंडपात केली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी ३४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप व १८ तारखेची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नवीन क्रीडा संकुलाच्या इमारतीत होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामपंचायत निवडणुकांच्या आतापर्यंतच्या इतिहासात मतदान वगळता मतमोजणीसह निवडणुकीची सर्व प्रक्रिया वडगाव येथील महसूल भवनातच पार पडली आहे. परंतु, यावेळी प्रथमच साहित्य वाटप व मतमोजणीची प्रक्रिया तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. ग्रामपंचायतींची मोठी संख्या व येथील जागेची अडचण लक्षात घेऊन ही प्रक्रिया तळेगाव येथे घेण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. 

निवडणुकीची तयारी 

तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींच्या ५१५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यात ५६ हजार ६१३ पुरुष व ५२ हजार २७५ महिला, असे एकूण एक लाख आठ हजार ८८९ मतदार सहभाग घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रत्येक मतदान केंद्रात ८०० पेक्षा अधिक मतदार राहणार नाहीत, अशा प्रकारे २२८ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय मतदान केंद्र राहणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी अकराशे जणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासाठी तीन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे पाच जणांचे पथक राहील. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन व्हावे व कायदा सुव्यवस्था राखली जावी, यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच, नागरिकांनी शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार बर्गे व नायब तहसीलदार चाटे यांनी केले आहे.

कोरोनामुळे खबरदारी  

निवडणूक प्रक्रिया राबविताना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बर्गे व नायब तहसीलदार चाटे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्‍यक ती दक्षता घेतली जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांच्या इमारती फवारणी करून सॅनिटाइझ केल्या जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान कर्मचाऱ्यांना कोविड संरक्षणासाठी आवश्‍यक ते किट आरोग्य विभागामार्फत दिले जाणार आहे. मतदारांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अनिवार्य करणार आहेत. प्रत्येक मतदाराची टेंपरेचर व स्कॅनिंग टेस्ट केली जाणार आहे. लक्षणे आढळलेल्या मतदारांना शेवटच्या तासांत मतदान करण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती बर्गे व चाटे यांनी दिली.

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval taluka gram panchayat elections vote counting in talegaon