ऐन लॉकडाउनमध्ये 'या' फाउंडेशनने एड्सग्रस्तांसाठी हे उल्लेखनीय काम केलंय

ऐन लॉकडाउनमध्ये 'या' फाउंडेशनने एड्सग्रस्तांसाठी हे उल्लेखनीय काम केलंय

भोसरी (पुणे) : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर लॅाकडाउन करण्यात आले. कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णावर उपचारासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. या काळामध्ये औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आल्याने इतर आजारावरील औषधे मिळण्याची सोय रुग्णांना झाली. मात्र, परिसरात असलेल्या एड्सग्रस्तांसाठीची औषधे ही विक्रीसाठी औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध नाहीत. ही औषधे शासनाच्या एआरटी केंद्रातच (अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी) मोफत उपलब्ध आहेत. एचआयव्ही पॅाझिटिव्ह रुग्णांना या औषधांचा डोस नियमित घ्यावा लागतो. या औषधांचा डोस हुकल्यास एचआयव्ही पॅाझिटिव्ह व्यक्तींना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, लॅाकडाउन काळामध्ये सर्वच व्यवहार आणि वाहनेही बंद असल्याने एचआयव्हीग्रस्तांना ही औषधे मिळणे अवघड होऊन बसले होते. मात्र, मंथन फाउंडेशन आणि रिलीफ फाउडेशन या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ही औषधे कोरोना संक्रमण काळातही घरपोच पुरवून  एचआयव्हीग्रस्तांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे  एचआयव्हीग्रस्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सहाय्य करीत आहेत. कोरोना संक्रमण काळात या संस्थांनी एचआयव्हीग्रस्तांसाठी केलेल्या कामाचे परिसरात कौतुक होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसर, चाकण, खेड, मंचर, जुन्नर आदी परिसरात सुमारे सहा हजार एचआयव्हीग्रस्त व्यक्ती आहेत. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींसाठी एआरटी औषधे शासनाद्वारे मोफत दिली जातात. या रुग्णांनी एआरटी औषधांचे डोस वेळेवर घेतले नाहीत, तर त्याचे अनेक दुष्परिणाम एचआयव्हीग्रस्त नागरिकांच्या आरोग्यावर झालेले दिसतात. प्रतिकार शक्ती कमी होणे, एआरटीमधील काही गोळ्या त्यांच्या आरोग्यास लागू न पडणे किंवा कोणत्याच गोळ्या लागू न पडणे आदी भयंकर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना लॉकडाउन काळामध्ये ही औषधे कशी मिळवायची, हा गंभीर प्रश्न होता. कारण लॅाकडाउनपूर्वी ही औषधे सामाजिक संस्थांद्वारे पुरविली जात असल्याने काही रुग्णांना एआरटी केंद्रांची माहिती नव्हती. त्याचप्रमाणे सर्व वाहने बंद असल्याने एआरटी केंद्रापर्यंत पोचायचे कसे अशा प्रश्नाबरोबरच औषधे आणताना स्वतः एचआयव्हीग्रस्त असल्याची माहिती नागरकांपर्यंत पोचेल काय असे प्रश्न एचआयव्ही ग्रस्त नागरिकांसमोर उभे होते.  

या काळामध्ये एचआयव्हीग्रस्त नागरिक मंथन फाउंडेशनशी संपर्क साधत होते. मात्र, कोरोना संक्रमण काळात संस्थेचे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी घबराट होती. त्यामुळे ही औषधे एचआयव्हीग्रस्त नागरिकांपर्यंत पोचवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्यावर फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी 'ही औषधे एचआयव्हीग्रस्तांपर्यंत पोचविली न गेल्यास एचआयव्हीग्रस्तांच्या जिवाला धोका असल्याच्या' गंभीर प्रश्नांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आणि कार्यकर्त्यांबरोबर स्वतः जाऊन ही औषधे एचआयव्ही ग्रस्तांपर्यंत पोचविण्याचा निर्णय भट्ट यांनी घेतला. फाउंडेशनद्वारे चाकण, खेड,  भोसरी, पिंपरी, चिंचवड परिसरातील एचआयव्ही ग्रस्तांना औषधे घरपोच पोचविली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचप्रमाणे फाउंडेशनने पाठपुरावा करून एचआयव्ही संक्रमित व्यक्तींना नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये  एआरटी औषधे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.  इतर जिल्हा व राज्यातून आलेल्या व लॉकडाउनमुळे गावी जाऊ शकले नाहीत अशा एचआयव्हीग्रस्तांनाही शासनाचे औषधे संस्थेने घरपोच पुरवली. एचआयव्हीग्रस्तांना औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना जीवनोपयोगी वस्तूही फाउंडेशनच्या पुढाकाराने वाटण्यात आल्या. लॅाकडाउन शिथील झाल्यावर एचआयव्हीग्रस्तांमध्ये जनजागृतीबरोबरच त्यांच्या वेळोवेळी तपासणीचे नियोजन करणे, गंभीर एचआयव्हीग्रस्तांना रुग्णांमध्ये दाखल करणे आदी कामेही करण्यात येत आहेत.  

लॅाकडाउनमध्ये एचआयव्हीग्रस्तांसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचालक लोकेश गभाणे, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक नांदापूरकर, पुणे जिल्हा एडेस प्रतिबंधक व नियंत्रक केंद्राचे प्रसाद सोनवणे, मनीष भोसले, त्याचप्रमाणे मंथन आणि रिलीफ फाउंडेशनचे अनिल बोरकर, संगीता मुरादे, कविता परदेशी, मनीषा परदेशी, तेजस वाघचौरे, देवीदास मोरे, अंजली नाटेकर, योगेश निकम, अनिता चव्हाण आदींनी परिश्रम घेतल्याची माहिती भट्ट यांनी दिली. त्यामुळेच लॅाकडाउन काळातही एचआयव्ही संक्रमित व्यक्तिंचे आरोग्य व्यवस्थित राहू शकले.

मंथन आणि रिलीफ फाउंडेशनबरोबरच पुणे परिसरात जॅानपॅाल स्लम डेवलपमेंट, कायाकल्प, एनएमपी प्लस, वायआरजी केअर तर पुणे-पिंपरी परिसरात जान्हवी, बारामतीत सौदामिनी आदी संस्थाही एचआयव्ही ग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत आहेत.        

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता जसं कोरोना विषाणू बाबतीत आहे, की कोरोना झालेल्या व्यक्ती पासून दूर राहणे, स्पर्श न करणे, भांडी, कपडे, स्नानगृह वेगळे, एकत्र जेवायचं नाही असे नियम आहेत. त्यामुळे ते एक प्रकारे वाळीत टाकल्यासारखे आहे व भेदभावसुद्धा होताना दिसतो आहे. मृत्युनंतर अंतिम संस्कारांनाही कोणी येत नाही. अगदी तसेच एचआयव्ही विषाणू संक्रमित व्यक्तीबाबतीत घडायचे. दोन्ही विषाणूंमध्ये फरक हाच की कोरोना श्वसन संस्थेवर आक्रमण करतो तर एचआयव्ही विषाणू मानवी रोग प्रतिकार शक्ती व पांढऱ्या पेशींवर आक्रमण करतो. एचआयव्हीवर नियंत्रण ठेवणारी औषधे आहेत. पण तो पूर्ण बरा होत नाही. तशीच लवकरच नियंत्रण करणारी औषधे कोरोनावर येतील व आपल्याकडील कोविड 19 मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होईल, ही आशा मी व्यक्त करते.

- आशा भट्ट, अध्यक्षा, मंथन फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com