कामगार कवी नारायण सुर्वे यांचा आज स्मृतिदिन, त्यांच्या कार्याचा एका कामगार साहित्यिकाने घेतलेला हा आढावा

सुरेश कंक, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शहर
Sunday, 16 August 2020

पद्मश्री कामगार कवी नारायण सुर्वे मास्तर यांचा आज स्मृतिदिन. पिंपरी चिंचवड शहरात साहित्य चळवळ रुजविण्यासाठी त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कामगार साहित्यिक घडविले. त्यांच्या कार्याचा एका कामगार साहित्यिकाने आढावा घेत सुर्वे मास्तरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुंबईचा एक गिरणी कामगार रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलाला उचलतो अन्‌ आपल्या घरी आणतो. तोच मुलगा पुढे साहित्य व कामगार चळवळीतील हिरा बनतो. तो मुलगा म्हणजे प्रख्यात कवी नारायण सुर्वे. सर्वांचे मास्तर. आजचा रविवार अर्थात 16 ऑगस्ट त्यांचा स्मृतिदिन. सुर्वे मास्तरांच्या आठवणींचा दिवस... 

"तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा । इन्सानकी औलाद हैं इन्सान बनेगा।...' हे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारे अजरामर गीत. याचे खरे वास्तव रूप म्हणजे संत कबीर व कामगार कवी नारायण सुर्वे. एकाच जातकुळीचे. निधर्मी. यातील सुर्वे मास्तर मुंबईच्या कामगारनगरीत वाढलेले. 'कामगार आहे, मी तळपती तलवार आहे...' असे कवितेच्या माध्यमातून ते सांगू लागले आणि कामगार कवी रूपाने जगप्रसिद्ध झाले. 'डोंगरी शेत माझं, गं मी बेनू किती' म्हणत शेतकरी मित्र झाले. 'असं पत्रात लिव्हा' या रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या कवितेमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. संत कबीर या मानाच्या पुरस्काराने गौरविले गेले. भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांचा परिस्पर्श कामगारनगरी, औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडलाही झाला आहे. येथील कामगारांकडे त्यांचे बारीक लक्ष होते. 

इथल्या श्रमिक कामगारांना सांस्कृतिक, साहित्यिक अन्‌ आध्यत्मिकतेची ओढ लागली होती. त्यांच्या मनातील घुसमट अनेकदा त्यांनी सुर्वे मास्तरांकडे व्यक्त केली होती. साहित्यिक उपक्रमांचा आनंद अन्‌ आस्वाद घेण्यासाठी येथील कामगार सतत पुणे शहरात जात होता. मास्तर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आले की, साहित्यिकांसोबत संवाद साधत होते. कामगार विश्‍वासाठी काही करू इच्छित होते. 'माणसाला माणूस जोडणे अन्‌ एकमेकांच्या सहकार्यातून साहित्य विचार पेरणे,' इतकेच या दूरदृष्टीच्या सुर्वे मास्तरांना माहित होते. 'या शहराची साहित्यिक भूक भागवली पाहिजे. ज्ञानोबा, तुकोबा अन्‌ मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीतील कष्टकरी कामगारांच्या हातात साहित्य लेखणीच्या उर्जेचा टाळ आपण दिला पाहिजे. इथल्या कामगारांच्या घामाच्या कवितेला सन्मानजनक व्यासपीठ मिळाले पाहिजे,' या विचारांनी मास्तर प्रेरित झाले होते. त्यामुळे त्यांनी येथील साहित्यिकांची बैठक बोलावली अन्‌ महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेची स्थापना झाली. 

साहित्यिकांच्या आग्रहास्तव काही वर्षे मास्तरांनी अध्यक्षपदी काम पाहिले. पण, वेळीच ते बाजूला झाले अन्‌ परिषदेची धुरा ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्याकडे आली. पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीची स्थापना याच काळात झाली. नरके यांच्यानंतर प्रभाकर साठे, ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे, कामगार कवी अरुण बोऱ्हाडे यांनी पद सांभाळले. सुर्वे मास्तर यांची नजर इथल्या लेखक, कवी, विचारवंतांवर होतीच. त्यामुळे त्यांना साहित्याच्या प्रांतात उदात्त हेतूने कार्यरत पुरुषोत्तम सदाफुले यांच्यासारखा हिरा गवसला. वृत्ती, विचार अन्‌ कामगारांच्या प्रति असणारी प्रचंड तळमळ, कामगार शिक्षक, कवी, लेखक आणि विचारवंत असे गुण सदाफुले यांच्यात जाणवले. ते अध्यक्ष झाले. वाढती लोकसंख्या देशाच्या प्रगतीचा मोठा अडसर आहे हे जाणून सदाफुले यांनी 'एका मुलावर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाचा सत्कार' हा विशेष कार्यक्रम जागतिक लोकसंख्या दिनाला सुरू केला. असंख्य कवी संमेलने, साहित्य संमेलने घेतली. गुणवंत कामगारांचे पहिले साहित्य संमेलन, गदिमा कविता महोत्सव, कामगारांचा सत्कार, ग्रामजागर साहित्य संमेलन, गुणवंत कामगार मेळावा असे उपक्रम राबविले. लेखक, कवींचा सन्मान केला. हे सुर्वे मास्तरांच्या नजरेने हेरल्यामुळेच शक्‍य झाले. 

सध्या कामगार भूषण जयवंत भोसले, मधू जोशी, बाजीराव सातपुते, राजेंद्र वाघ, अरुण गराडे, मनोहर दिवाण, हनुमंत देशमुख, सुभाष चव्हाण, अशोक साठे हे कामगार महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेत कार्यरत आहेत. गुणवंत कामगार आणि प्रज्ञावंत कवी उद्धव कानडे धाकट्या भावाप्रमाणे सदाफुले मास्तर यांच्या सोबत काम करीत आहेत. शहरातील सर्व कामगार आणि साहित्यिक मंडळी आजही या सर्व विविध वैचारिक उपक्रमांचा आनंद घेत आहेत. कामगार जगताचे आराध्य दैवत महाकवी नारायण सुर्वे मास्तर यांनी लावलेले रोप आता विकसित झाले आहे. सुर्वे मास्तर आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या नावे 'नारायण सुर्वे कला अकादमी महाराष्ट्र राज्य' या संस्थेची स्थापना सदाफुले यांनी केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुदाम भोरे काम पाहात आहेत. या संस्थेच्या वतीनेही प्रतिवर्षी श्रमिक कामगार यांचे तीर्थ असलेल्या, कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील निवासस्थानी जाऊन काव्यांजली समर्पित करीत आहेत. मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे म्हणतात, "सगळ्या महाराष्ट्रातील कवी माझी लेकरे आहेत.'' माईला भेटायला ही लेकरे आली की, त्यांचे मन भरून येते. पिंपरी-चिंचवड शहरात व्यापक साहित्यिक चळवळ रुजावी, वाढावी अन्‌ समृद्ध व्हावी यासाठी कामगार कवी नारायण सुर्वे यांचे मोठे योगदान आहे, त्यांना विनम्र अभिवादन। 

- सुरेश कंक, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शहर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memorial day of workers poet narayan surve master pimpri chinchwad