पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्ध्यांसाठी गुणकारी ठरली मानसिक 'रसद' 

मंगेश पांडे 
Friday, 4 December 2020

  • आयुक्तालयातील सेलने दिला बाधित पोलिसांना मानसिक आधार 

पिंपरी : जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोनासारख्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी डॉक्‍टरांच्या मदतीसह योग्य नियोजन व मानसिक आधाराच्या ताकदीवर नमवले. ही किमया साधली आहे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील कोरोना सेलने. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असताना कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या कोरोना योद्धयांना वाचविण्यासाठी पोलिस ताकदीने लढल्याने त्यांच्यापुढे कोरोनाला हार पत्करावी लागल्याचे चित्र येथील पोलिस दलात पाहायला मिळाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्याने पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये 525 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य उपाययोजना राबविल्या. तातडीने स्थापना केलेल्या कोरोना सेलमध्ये एक सहायक निरीक्षक, सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासह प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती घेतली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हसाठी रुग्णालय, बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी अगोदरपासूनच शासकीय रूग्णांलयांसह चार खासगी रूग्णालयांशीही संपर्क साधून बेडची व्यवस्था केली. रुग्णालयातील औषधांसह आयुक्तालयानेही इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने औषधे, इंजेक्‍शन उपलब्ध केली. त्यामुळे औषधांचा तुटवडा भासला नाही. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला दाखल केल्यानंतर दररोज आरोग्याची अधिकाऱ्यांकडून फोनवरून व प्रत्यक्ष चौकशी केली जात होती. 525 पैकी 34 जणांची प्रकृती गंभीर असताना डॉक्‍टरांसह युद्धपातळीवर प्रयत्न केले. सेलच्या अधिकाऱ्यांकडून रुग्णाला मानसिक आधार दिला गेला. यामुळे 34 जण अक्षरशः: मृत्यूच्या दाढेतून परतले. सुदैवाने बाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. 

दाटून कंठ येतो 

रुणालयात असताना वरिष्ठांकडून केली जाणारी चौकशी व दिलेला मानसिक, भावनिक आधार याबाबत सांगताना कोरोनामुक्त पोलिसांचा अक्षरशः: कंठ दाटून येतो. आमच्यासारख्या योद्धयांना वाचविण्यासाठी कोरोना सेल व वरिष्ठ अधिकारी ताकदीने लढल्याने त्यांच्यापुढे कोरोनाला हार पत्करावी लागली, अशी भावनाही कोरोनामुक्त पोलिस व्यक्त करतात. 

नतमस्तक होऊनच बाहेर पडणार 

प्रकृती अतिशय गंभीर आहे. रुग्णाचे काहीही सांगता येत नाही, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले होते. सेलच्या पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णासह त्याच्या कुटुंबाला धीर दिला. डॉक्‍टरांशी चर्चा करून तातडीने रुग्णाला हवी ती औषधे उपलब्ध करून दिली. अशा प्रकारच्या मानसिक आधारामुळे जीवनाच्या अखेरच्या घटका मोजणारा रुग्ण बरा झाला. ज्या अधिकाऱ्यांमुळे मला नवजीवन मिळाले त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊनच रुग्णालयातून बाहेर पडणार, असा आग्रह कोरोनामुक्त झालेल्या पोलिसाने धरला व त्या अधिकाऱ्याचे आशीर्वाद घेतल्यानंतरच रुग्णालय सोडले. 

"रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सहायक आयुक्त आर. आर. पाटील दररोज संपर्कात होते. उपचारादरम्यान न्यूमोनिया झाल्याने प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. माझ्या वॉर्डातीलच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याने आणखी खचलो. दरम्यान, पाटील संपर्कात होते. त्यांनी अनेकदा माझी भेट घेत आधार दिला. आवश्‍यक ती औषधे उपलब्ध करून दिली. पोलिस दल व आर. आर. पाटील यांच्यामुळे मी या जगात आहे.'' 
- जमीर तांबोळी, कर्मचारी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पायाखालची जमीन सरकली. मात्र, प्रशासनाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांचा फोन आला. रुग्णालय व बेडची तातडीने व्यवस्था करून दिली. आवश्‍यक ती औषधेही पुरवली. पोलिस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे काही दिवसांतच संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त झाले.'' 
- बाळासाहेब शिंदे, सहायक निरीक्षक

'त्यांना' तातडीने आर्थिक मदत 

हवालदार संतोष प्रताप झेंडे, अंबरनाथ रामचंद्र कोकणे व पोलिस नाईक रमेश वामन लोहकरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे प्रत्येकी पन्नास लाखांचे अनुदान तसेच पोलिस कल्याण निधीतून दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यासाठीही कोरोना सेलने तातडीने पाठपुरावा केला. 

सद्यःस्थिती 

  • एकूण कोरोनाबाधित : 525 
  • कोरोनामुक्‍त : 518 
  • उपचार सुरू : 4 
  • मृत्यू : 3 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mental support of cell in the commissionerate to the corona infected police at pimpri chinchwad