esakal | बगाड मिरवणुकीतून कोरोनाला हरविण्याचा संदेश

बोलून बातमी शोधा

Vinode Family Bagad

बगाड मिरवणुकीतून कोरोनाला हरविण्याचा संदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड - वाकड-हिंजवडीच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बगाड मिरवणूक. ही मिरवणूक चक्क एका घरातून निघाली. म्हातोबाचा चांगभलं असा जयघोष झाला. भंडारा अन् खोबऱ्याची उधळण झाली. मात्र, बगाडावर गळ टोचलेला गळकरी होता ना माणसांची गर्दी. चिल्ल्या-पिल्ल्यांसह जेमतेम आठ माणसांच्या या मिरवणुकीत ‘घरी रहा- सुरक्षित रहा, घरूनच उत्सव साजरा करा’ असा संदेश देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत म्हातोबा महाराजांची यात्रा व बगाड मिरवणूक रद्द झाल्याने वाकडमधील रहिवासी व उत्सव कमिटी सदस्य राहुल विनोदे परिवाराने लाकडी प्रतिकात्मक बगाड तयार केले. पारंपरिक पद्धतीने घरगुती पूजा-अर्चा करीत घराच्या आवारातच मिरवणूकही काढली. ‘म्हातोबाचा... चांगभलं...’ असा जयघोष करीत घरी राहिलात तर पुढच्या वर्षी उर्साला (यात्रा) भेटू, असे साकडेही घातले. कोरोनामुळे सलग दोन वर्षे यात्रा रद्द झाल्याने वाकड-हिंजवडी ग्रामस्थांची मोठी निराशा झाली आहे.

यात्रेची आस असलेल्या लहानग्यांचाही हिरमोड झाला आहे. सर्वांनाच घरच्या घरी उत्सवाचा आनंद लुटता यावा अन् या धार्मिक कार्यक्रमाद्वारे इतर ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याची संकल्पना राहुल विनोदे यांना सुचली. त्यानुसार त्यांनी गेल्या आठ दिवसापासून चिल्ल्यापिल्यांच्या मदतीने बगाड बनवायला सुरुवात केली. बगाड निर्मितीसाठी त्यांना वडीलधारी मंडळी आनंदा विनोदे, पंडित विनोदे यांनी मार्गदर्शन केले.