पिंपरी : परराज्यातील कामगारांच्या वापसीसाठी महामेट्रोकडून हे प्रयत्न सुरू

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार त्यांच्या गावी निघून गेल्याने मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला आहे.

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार त्यांच्या गावी निघून गेल्याने मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोचे काम ठप्प झाले आहे. या कामाला गती देण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मेट्रो प्रकल्पावर काम करणारे कामगार हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यातील आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे, त्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांना या कामगारांना पुण्याला परतण्यासाठी आवश्‍यक असणारे पास आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे विनंतीपत्र महामेट्रोकडून पाठवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

मेट्रोकडून देण्यात आलेल्या या पत्राचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून, परराज्यात गेलेले कर्मचारी पुन्हा कामावर परतू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी दहाजण परतल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले. मेट्रोच्या पुणे आणि नागपूर प्रकल्पामध्ये काम करणारे सर्वाधिक कामागार हे मध्य प्रदेशमधील भोपाळ, विदीसा, रायसेन या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना महामेट्रोकडून त्यासंदर्भातील सविस्तर पत्र देण्यात आले आहे. या पत्रानंतर संबधित जिल्हा प्रशासनाकडून या कामगारांना पुन्हा परतण्यासाठी आवश्‍यक असणारी पास आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. उत्तरप्रदेशातील लखनौ, बिहारमधील पटना, कोलकाता याठिकाणी राहणारे अनेक जण मेट्रो प्रकल्पावर काम करत आहेत. त्यामुळे तिथल्या जिल्हा प्रशासनाला अशाच आशयाचे पत्र देण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामाला खो... 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मेट्रोचे काम वेगात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परप्रांतिय कामगार गावी परतल्यामुळे त्याला खो बसला आहे. सध्या 880 कामगारांच्या साह्याने पुणे आणि पिंपरी परिसरातील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तूर्तात कामाला गती नाही. मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबधित कंत्राटदारांकडून मनुष्यबळाची जमवाजमव सुरु करण्याचे काम सुरु असल्याचे समजते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मेट्रो सुरू होण्यासाठी वाट पाहा...

प्रशासनाने वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यानच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. मात्र, आता कामच ठप्प झाल्यामुळे यासाठी आणखी सहा ते आठ महिने वाट पाहावी लागणार आहे. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर या कामाचा वेग वाढणार असल्याने ते कधी उपलब्ध होऊ शकेल, याचे उत्तर तूर्तास प्रशासनाकडे नाही. 

मेट्रो प्रकल्पावर काम करणारे परराज्यातील कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी गेले आहेत. लॉकडाउन शिथिल होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना परत मेट्रोच्या कामावर परतण्यासाठी पास आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात यासाठी महामेट्रोकडून संबधित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना विनंती पत्र देण्यात आली आहेत. 
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, महामेट्रो
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: metro efforts to bringing labour from other state