पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

  • खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
  • केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घेतली भेट 

पिंपरी : पुणे महामेट्रोचे फुगेवाडी ते पिंपरी दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मेट्रो पिंपरीपासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केवळ केंद्र सरकारची मान्यता बाकी आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे केली आहे. त्यावर राज्य सरकारच्या प्रस्तावाची माहिती घेऊन मान्यता देण्याचे आश्‍वासन पुरी यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांकडून मिळतेय वाईट वागणूक; 'सकाळ'च्या पाहणीत वास्तव उघड

पुणे मेट्रो रेल्वेअंतर्गत स्वारगेट ते पिंपरी या मार्गाला केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. त्यातील फुगेवाडी ते पिंपरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरू करावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. यापार्श्‍वभूमीवर खासदार बारणे यांनी शहरी विकासमंत्री पुरी यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारने दिलेली मंजुरी, खर्चाच्या मंजुरीबाबतचे पत्र दिले व केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेवून हा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, शहरी विकास मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवून विस्तारीकरणाच्या खर्चाबाबत विचारणा केली होती. पुरी यांनी मार्च महिन्यापर्यंत येणारा खर्च, त्यांची मंजुरी व डिझाईन, इतर बाबी याबाबत सहमती मागितली. महाराष्ट्र सरकारने जूनमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन प्रस्ताव पाठवला होता. याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयास पत्र पाठवून कळविले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 155 कोटीचा हिस्सा व पहिल्याच टप्प्यात हा प्रकल्प घेतल्याने त्याचे अंतर कमी असल्याने महाराष्ट्र सरकार पहिल्या टप्प्यातील हिस्सा देण्यास तयार असल्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना सांगितले. आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची कल्पना देऊन केंद्रीय कॅबिनेटमध्ये पुणे मेट्रोअंतर्गत पहिल्या टप्प्यात निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. यावर केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्य सरकारकडून आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली जाईल. त्यांनतर तत्काळ मंजुरी देण्याचे आशवासन दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro expansion proposal from Pimpri to Nigdi in final stage