Pune Metro : निगडी ते चाकणपर्यंत मेट्रो धावणार; एकूण ४२ किलोमीटरचे अंतर

पिंपरी-चिंचवड शहराला दापोडी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गानंतर आता निगडी ते चाकण हा दुसरा मार्ग मिळणार आहे.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

- राहुल हातोले

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला दापोडी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गानंतर आता निगडी ते चाकण हा दुसरा मार्ग मिळणार आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोच्या वतीने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्याच्या कामास सुरूवात केली आहे. आराखडा बनल्यानंतर लवकरच तो पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला जाईल.

निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून चाकणपर्यंत हा मेट्रो मार्ग राहणार आहे. एकूण ४२ किमीपर्यंतचा हा मार्ग असणार आहे. त्यामुळे शहरातील केवळ २५ टक्केच भाग आता मेट्रोच्या ‘कनेक्टिव्हिटी’शिवाय शिल्लक राहणार आहे.

औद्योगिक शहर पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या तीस लाखांहून अधिक आहे. पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा असल्याने या भागांत दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी शहरातील विविध संस्था आणि संघटनांकडून करण्यात आली.

या मागणीचा विचार करत महापालिकेच्यावतीने मेट्रोच्या नव्या मार्गाबाबत मेट्रो प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे.

वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गामुळे निगडी ते दापोडी मार्गामुळे पिंपरी-चिंचवडचा ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आराखडा येत्या ४ ते ५ महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.

निगडी, नाशिक फाटा येथे जंक्शन

या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. या जंक्शनवरून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग व पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्थानक येथे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे. मेट्रोतून शहरातील बहुतांश भागांत प्रवास करता येईल.

असा असेल नवा मार्ग

निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्‍थानक, रावेत, मुकाई चौक, पुणे- मुंबई - बेंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे. या मार्गाचे अंदाजे ४२ किलोमीटर इतके अंतर आहे.

हे भाग मेट्रोला जोडणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनेवरून महामेट्रोकडून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी मार्गे चाकणपर्यंत मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या नव्या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा एक तृतीय अंश भागातून मेट्रो धावेल.

निगडी भक्ती-शक्ती चौक - रावेत मुकाई चौक - पिंपळे सौदागर - पिंपळे गुरव - नाशिक फाटा ते चाकण या नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग ४२ किमी अंतराचा आहे. त्यामुळे शहरातील ७५ टक्के भाग हा मेट्रोशी जोडला जाणार आहे.

- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Metro Expansion Gains Momentum with Airport Connectivity and New Flyover Plan
Two Firms Partner for Hinjewadi Metro Feeder Service; 20 Smart Buses on 14 Routes
Pune Metro’s New Identity: 100 Women Loco Pilots Ready to Lead the Way
Pimpri
Marathi News Esakal
www.esakal.com