esakal | पिंपरी : ‘मी जबाबदार’ ॲपचे पालिकेतर्फे अनावरण

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी : ‘मी जबाबदार’ ॲपचे पालिकेतर्फे अनावरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आपल्या जवळची व्यक्ती, नातेवाईक, ओळखीतील कोणाला संसर्ग झाला, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोठे संपर्क साधायचा, कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे, तिथे बेड मिळणार का, आयसोलेशन बेड असेल का, ते रुग्णालय सरकारी असेल की खासगी... असे प्रश्‍न मनात निर्माण होतात. अशा स्थितीत काहीच सुचत नाही. अशा कठीण परिस्थितीत तुमच्या सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने ‘मी जबाबदार’ (Me Jababdar-PCMC) हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचे ऑनलाइन अनावरण शनिवारी करण्यात आले.

‘मी जबाबदार’ ॲपचे लोकार्पण महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. या ऑनलाइन कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता तथा प्रवक्ता शिरीष पोरेडी, वैद्यकीय अधिकारी तथा वॉररूमचे समन्वयक डॉ. क्रिस्टोफर झेवियर, संगणक अधिकारी बोरुडे, सुधीर बोराडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पिंपरीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील घरांचे नुकसान

काय आहे ॲपमध्ये

रुग्ण व नातेवाइकांना हॉस्पिटलसंबंधी भेडसावणाऱ्या सर्व समस्या, अडचणींचे निराकरण ॲपमुळे होणार आहे. हॉस्पिटल सरकारी असो, महापालिकेचे असो की खासगी, यांची माहिती उपलब्ध आहे. तेथील उपलब्ध बेडची संख्या, आयसोलेशन वॉर्ड, आवश्‍यक सर्व हॉस्पिटलची माहिती, संपर्क क्रमांक, गुगल मॅप लोकेशन यांची सुविधा आहे. सरकार व महापालिकेच्या मार्गदर्शन सूचनांची माहिती आहे. नवीन आदेश व सूचनांद्वारे वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. व्हेंटिलेटर असलेले व नसलेले आयसोलेशन बेड, ऑक्सिजनसह व त्याशिवायचे बेड यांची माहिती प्रत्येक तासाला अपडेट केली जाणार आहे. बेड उपलब्ध असलेले हॉस्पिटल सरकारी आहे की खासगी यांसह शहरातील विविध कोविड केअर सेंटरची माहिती ॲपद्वारे मिळणार आहे. टेलि मेडिसीन, बेड मॅनेजमेंट व स्वास्थ्य हेल्पलाइन उपलब्ध आहे. संपर्क क्रमांकासह गावनिहाय तपासणी केंद्र, लसीकरण केंद्रांची माहिती आहे.