पिंपरी-चिंचवड : कचऱ्याचे विलगीकरण करा म्हणणारेच कचरा एकत्र करतायेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

  • नागरिकांचा आरोप; विलगीकरण योजनेचा उद्देशालाच हरताळ 

पिंपरी : घरातच कचरा विलगीकरण करा. ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा. जर असे केले नाही, तर पहिल्या वेळी शंभर दंड व दुसऱ्या वेळी पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, अशा सूचना आणि इशारा कचरा उचलणाऱ्या वाहनांवरील भोंग्याद्वारे नागरिकांना महापालिका देते. त्यामुळे बहुतांश नागरिक कचरा विलग करूनच देतात; पण उचलणारे मात्र आमच्या डोळ्यांदेखत तो एकत्र करून घेऊन जातात. हे कचरा विलगीकरणास सहाय्यकारी होत नाही. त्यामुळे योजनेचा उद्देश पूर्ण होत नसल्याचे सांगत होते निगडी-सिंधूनगरमधील ए. एम. ढवळे. अशाच प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी घडत असल्याची शंका नाकारता येत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'स्वच्छ शहर' अंतर्गत घनकचरा विलगीकरणाची मोहीम महापालिका राबवत आहे. त्यामुळे अनेक परिसरातील कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना कचरा वेगळा करण्याच्या सूचना देण्यात येते आणि नंतरच कचरा उचलला जातो. तसे न झाल्यास नागरिक किंवा मोठ्या सोसायट्यांना दंड केला जातो. काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिल्यावरही उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कचरा एकत्र होत असल्याचे प्रकार घडत असल्याची तक्रारच ढवळे यांनी महापालिकेच्या प्रतिक्रिया नोंदवहीत नोंदवली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ढवळे यांच्या मते, "आम्ही सूचनांचे काटेकोर पालन करतो. त्यात सांगितल्याप्रमाणे "ओला व सुका' असे दोन स्टिकरपण लावतो. त्या दोन बकेटमध्ये ओला व सुका अशा दोन गाडीच्या कप्प्यातच गेला तरच कचऱ्याने योग्यरीत्या विलगीकरण होईल; पण अनेकदा तसे होताना दिसत नाही. दोन्ही बकेटमधील कचरा एकाच मोठ्या बकेटमध्ये टाकला जातो. नंतर तो गाडीच्या कोणत्या तरी एका कप्प्यात टाकला जातो, हे चुकीचे आहे. आम्ही घरात सर्वांना ताकीद देऊन कचरा वेगळा टाकायला सक्ती करतो. उचलणारे; मात्र आमच्या डोळ्यांदेखत तो एकत्र करून घेऊन जातो. तरी महापालिकेने हा पायंडा मोडीत काढावा.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यमुनानगरमधील नीलेश शिंदे म्हणाले, ""कचरा विलगीकरणाची फार मोठी समस्या आहे. ती सोडवणे गरजेचे आहे. संपूर्ण परिसरातील कचरा एक दिवस ओला व दुसऱ्या दिवशी सुका, अशा पद्धतीने संकलित करावा. परिणामी साधन सामग्री, मनुष्यबळ तेच वापरता येईल. गाड्यांची तोडफोड न करता (रिनिव्हेशन) त्यासाठी वापरता येईल. फक्त दोन फलक तयार करावेत. आज फक्त ओला कचरा उचलला जाईल, तर दुसऱ्या सुका कचरा उचलण्यात येईल', असे फलक लावणे गरजेचे आहे. त्यामुळे एकाच दिवशी ओला व सुका कचरा एकत्र होणार नाही.'' 

आमच्याकडे या बाबत तक्रारी आल्यावर नक्कीच कारवाई करू. त्या विभागातील कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात येतील. 
- तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mix garbage collection from pimpri chinchwad municipal corporation employees