
Molestation of women officers : सेवा विकास बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास त्वरीत निलंबित करण्याची मागणी
पिंपरी : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पिंपरीतील सेवा विकास बँकेतील एका महिला सहकारी अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बक्षानी यांना त्वरीत निंलंबित करावे, अशी मागणी बँकेच्या भहिला भागधारकांनी बँकेचे अवसायक दादासाहेब काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच; पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही त्वरीत कार्यवाही करुन संपबंधीत आरोपीस अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मनोज बक्षानी यांच्याविरोधात बँकेतील एका महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा फौजदारी गुन्हा रविवार (ता. ११) दाखल केलेला आहे.
दरम्यान; पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात, ‘ मागील दीड वर्षापासून मनोज लक्ष्मणदास बक्षाणी हा मला वारंवार त्याच्या कार्यालयात बोलवून श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्याप्रमाणे तू काम केले नाही तर; तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकावून कामावरुन काढून टाकेल’ , अशी वारंवार धमकी देत आहे, असे म्हटले आहे. अशा व्यक्तीला व अशा वृत्तीला वेळीच ठेचणे आवश्यक आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नाराधमांची बँकेतून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अशा व्यक्तीला उच्चपदावर बसण्याची काहीही नैतिक अधिकार नाही.
अशा व्यक्तीमुळे महिला कर्मचारी व बँकेत येणाऱ्या इतर महिलांना व सभासदांना असुरक्षित वाटू लागले आहे. तरी मनोज बक्षाणी या मदमाशाला त्वरीत निलंबित करण्यात यावे. अन्यथा बँकेवर महिलांचा मोर्चा व आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर मनिषा गायकवाड, मोनिका गायकवाड, आशा गांगर्डे, जयसिंथा फ्रान्सीस, नीता गौड, उमा कुचेकर, संगिता दिवटे, अनिता पाटील, सिमा कुचेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.