
पिंपरी : शहरात निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदेशी प्रजातींची झाडे सर्वाधिक पडल्याचा निष्कर्ष पर्यावरण प्रेमींनी काढला आहे. विदेशी झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. त्यामुळे ती वादळवाऱ्यापुढे टिकाव धरत नाहीत आणि लवकर उन्मळून पडतात, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेच्या उद्यान विभागाने त्याचे खंडन केले असून देशी आणि विदेशी या दोन्ही प्रजातींची झाडे पडल्याचा दावा केला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शहर परिसरात बुधवारी सर्वाधिक म्हणजे सुमारे 110 झाडे पडल्याची महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे नोंद झाली आहे. तर महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवरही झाडे पडल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या. उद्यान विभागाचे अग्निशमन दलाच्या सहकार्याने झाडे हटविण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, आता विदेशी झाडांपेक्षा देशी झाडेच लावणे अधिक योग्य आहे अथवा नाही या चर्चेला तोंड फुटले आहे.
अलाईव्ह संस्थेचे अध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, "विदेशी झाडे इथली नसून त्यांना स्पर्धक किंवा नियंत्रक नाहीत. भरपूर पाणी मिळत असल्याने ही झाडे भराभर वाढतात. त्यांची मुळे खोलवर जात नाहीत. त्यामुळे अशा वादळासमोर झाडे टिकाव धरत नाहीत आणि लवकर उन्मळून पडतात. देशी झाडे सहज पडत नाहीत. त्यांची चुकीच्या पद्धतीने छाटणी केली असल्यास त्याचा तोल जाऊन ते पडते. त्यामुळे देशी झाडे लावणेच योग्य आहे.''
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पर्यावरणप्रेमी डॉ. संदीप बाहेती म्हणाले, "ज्या झाडांची मुळे खोलवर गेली आहेत. तिथे हा प्रश्न येत नाही. परंतु, चुकीच्या पद्धतीने रोपण केल्याने झाडे पडतात. 25 वर्षांपूर्वीची झाडे पडणे स्वाभाविक आहे. मात्र, 4 ते 5 वर्षांपूर्वीची छोटी झाडे पडण्यामागे चुकीची लागवड पद्धत आहे. खड्डा घेऊन झाडे लावणे योग्य असताना अगोदर चार इंच उंचीचे चौकोन करुन झाडे लावली गेली. डांबरीकरणाने खड्डे घेण्याचा खर्च वाढतो. खड्डे खोल घेतल्यास व सुनियोजित फांद्या कापल्यास पडण्याचा धोका कमी होतो.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पर्यावरण प्रेमींचे आक्षेप
- विदेशी प्रजातींचे वृक्ष सर्वाधिक मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, अफ्रिका, मादागास्कर येथील आहेत. तेथील वातावरण, जमीन आपल्यापेक्षा वेगळी आहे.
- झाडांभोवती मोकळी जागा ठेवली नाही. कॉंक्रीट, फरशी किंवा डांबरीकरणाने बंदिस्त केली. ती देशी आणि विदेशी अशी दोन्ही प्रजातींची झाडे पडली
- पडलेल्या देशी झाडांमध्ये पिंपळ, कांचन आहेत. मात्र, विदेशी झाडांमध्ये सुबाभूळ, गुलमोहर, ताम्रशिंगी किंवा सोनमोहर, पर्जन्य वृक्ष आदी झाडे सर्वाधिक प्रमाण
- झाडे लागवडी पद्धत चुकीची, खड्डे खोलवर घेतले जात नाहीत.
- वारंवार नियोजनशून्य रस्त्याच्या आणि भूमिगत गटारांच्या कामांमुळे झाडांच्या मुळांना धोका पोचतो
रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण किंवा डांबरीकरण याचा झाडे पडण्याशी संबंध नाही. डांबरी रस्ते असल्यास झाडांची मुळे रस्ते उखडतात. महापालिकेने 1984 मध्ये सुबाभूळ आणि निलगिरीची झाडे लावली आहेत. 30 ते 40 वर्षांपूर्वीची झाडे कशी जगणार? त्यांचे आर्युमान संपले आहे. काही ठिकाणी देशी आणि विदेशी अशी दोन्ही झाडे पडली आहेत. त्यामुळे, विदेशी झाडे अधिक पडली या दाव्यात काही तथ्य नाही.
- प्रकाश गायकवाड, उद्यान अधीक्षक (वृक्षसंवर्धन), पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.