
पिंपरी : महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने चिखली येथे शहरातील सर्वांत मोठे 850 बेडचे मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये चिखलीतील हॉस्पिटलचा प्रस्ताव ऐनवेळी ठेवण्यात आला. त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा
चिखलीतील गट क्रमांक 1653 मध्ये सुमारे 20.22 हेक्टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, त्यातील सुमारे दोन हेक्टर जागेवर प्रशस्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती मिळेल.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वैद्यकीय महाविद्यालयाचे नियोजन
सध्या महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. त्याची क्षमता सातशे खाटांची आहे. त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा, या हेतूने शासकीय पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर चिखलीत होणाऱ्या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि अन्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत, या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आमदार लांडगे आग्रही आहेत. या महाविद्यालयात नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक असे अभ्यासक्रमांचीही सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागाचा फायदा
सध्याच्या वायसीएम रुग्णालयासह पिंपरी-चिंचवडसह लगतच्या मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. तुलनेने खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा ताण वायसीएमवर येत आहे. त्यातील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेला मर्यादा आहेत. त्यामुळे वायसीएमला पर्यायी वैद्यकीय व्यवस्था उभी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी चिखलीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय केंद्र बिंदू ठरणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(संपादन : शिवनंदन बाविस्कर)