करवाढ न करण्यावर शिक्कामोर्तब; महापालिका स्थायी समितीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर आगामी वर्षात शहरातील मिळकती आणि इतर बाबींवर कर दरवाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारच्या स्थायी समितीसमोर ठेवला होता.

पिंपरी - कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर आगामी वर्षात शहरातील मिळकती आणि इतर बाबींवर कर दरवाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारच्या स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास समितीने मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी तो महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस केली. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामान्य करामध्ये 12 हजार रुपयांपर्यंतच्या करयोग्य मूल्यावर निवासी मिळकतीकरीता 13 टक्के व निवासेत्त्र मिळकतींवर 14 टक्के दर असेल. 12 हजारांपुढील 30 हजार रुपयांच्या करयोग्य मूल्यावर निवासीसाठी 16 तर निवासेत्तरसाठी 17 टक्के दर असेल. 30 हजारांपुढील करयोग्य मूल्यावर दोन्ही प्रकारच्या मिळकतींसाठी 24 टक्के दर असेल. इतर करांच्या दरामध्येसुद्धा बदल केलेला नाही. ते दर मागील वर्षा इतकेच असतील. यात साफसफाई, अग्निशामक, शिक्षण, मलप्रवाह सुविधा लाभ, पाणीपुरवठा लाभ, रस्ता, विशेष साफसफाई आणि वृक्षकराचा समावेश आहे. नाट्यगृह तथा करमणूक करातही बदल केलेला नाही. मात्र, पाचशेपेक्षा अधिक बैठक व्यवस्था असणाऱ्या थिएटरला प्रतिस्क्रीन 250 रुपये व वातानुकुलित थिएटरसाठी प्रतिस्क्रीन 350 रुपये करमणूक कर आकारला जाणार आहे. मराठी सिनेमांना करमाफी दिली आहे. नाटक, सर्कस, तमाशा, संगीत जलसे, शास्त्रीय संगीत कार्यक्रमांच्या प्रतिप्रयोगास शंभर रुपये, कुस्ती व मुष्टीयुद्धाच्या प्रतिप्रयोगास 50 रुपये आणि इतर प्रत्येक प्रयोगाला प्रत्येक दिवसासाठी शंभर रुपये कर आकारला जाणार आहे. 

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांगांना सूट 
सामान्य कर, साफसफाई कर, अग्निशामक कर आणि उपशिक्षण कर यांचा समावेश असलेल्या सामान्य कराच्या रकमेत सूट देण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची पत्नी यांच्या स्वत: राहात असलेल्या फक्त एका निवासी घरास आकारण्यात येणाऱ्या सामान्य कर रकमेच्या 50 टक्के रक्कम सूट देण्यात येणार आहे. अशीच सूट फक्त महिलांच्या नावे असलेल्या, स्वत: राहत असलेल्या फक्त एका निवासी घरास, तसेच 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्यांच्या नावावर असलेल्या मिळकतींनाही सामान्य कर रकमेच्या 50 टक्के रक्कम सूट देण्यात येणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

यांना मिळणार सामान्य करात सूट 
- संपूर्ण मिळकतकराची रक्कम आगाऊ भरणारे 
- ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र प्राप्त मिळकतींना रेटिंगप्रमाणे 
- शौर्यपदक विजेते सैनिक व वीरपत्नींच्या मिळकती 
- अविवाहित शहीद जवानांच्या नामनिर्देशित व्यक्तींची घरे 
- शहरात राहणारे माजी सैनिक 
- थकबाकीसह एक रकमी मिळकतकराचा भरणा ऑनलाईन भरणारे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Shravan Hardikar proposal not to raise taxes on income