प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पिंपरी - पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. 

जसप्रीतसिंग अमरजितसिंग सत्याल (वय 30, रा. औरंगाबाद), आनंद उर्फ दादुस मोहन इंगळे (वय 27, रा. उल्हासनगर) यांना अटक केली. तर सुनील भगवान हिवाळे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने फिर्याद दिलेली आहे. सत्याल व फिर्यादीच्या पत्नीचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, दोघे एका समाजाचे नसल्याने त्यांचे लग्न झाले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सत्यालच्या प्रेयसीचे व फिर्यादीचे लग्न झाले. याबाबत प्रेयसीने सत्यालला कल्पना दिली असता त्यानेही विरोध न करता मान्यता दिली. लग्नानंतर फिर्यादीच्या पत्नीला फोनवरून हिवाळे मार्फत अनोळखी क्रमांकावरून धमकीचे फोन यायचे. त्यांचा पाठलाग केला जायचा. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी पंधरा दिवस या परिसरात पाळत ठेवली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 दरम्यान, जुन्या सांगवीतील मुळानगर रोड येथे 9 जानेवारीला रात्री पावणे आठच्या सुमारास फिर्यादी हे पत्नीसह जेवण झाल्यानंतर फिरायला गेले होते. त्यावेळी सत्याल याच्या सांगण्यावरून आनंद इंगळे याने फिर्यादीवर जवळून गोळी झाडून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

फिर्यादीकडे व त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता फिर्यादीच्या पत्नीचा पूर्वीचा प्रियकर सत्याल याच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानुसार तांत्रिक तपासाच्या आधारावर हा गुन्हा सत्याल याच्या सांगण्यावरून सुनील हिवाळे याच्या मदतीने कट रचून इतर आरोपींच्या सहाय्याने केल्याचे निष्पन्न झाले. 

मीटरप्रमाणे धावणार रिक्षा; शहर पोलिसांचे नियोजन

त्यानुसार सत्याल, आनंद इंगळे व सुनील हिवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इंगळे याच्यावर उल्हासनगर सेंट्रल पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

राजकीय दबाव 
घटना घडल्याच्या दिवशी आरोपी सत्याल याच्या आजीचे निधन झाले होते. त्यामुळे तो असा करू शकत नाही, असे सांगत त्याला ताब्यात घेऊ नका अशाप्रकारचा दबाव राजकीय मंडळींकडून पोलिसांवर टाकला जात होता. मात्र, पोलिसांनी दबाव झुगारून पुढील कारवाई केली. 

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती;आर्थिक ताळेबंद करार

मोबाईलमुळे वाचला जीव 
फिर्यादी हे पत्नीसह फिरण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या मेहुणीचा फोन आला होता. मोबाईलवरून फोनवर बोलत असतानाच हल्लेखोराने गोळी झाडली. त्यावेळी मोबाईलमुळे गोळी मानेत शिरली. अन्यथा ही गोळी डोक्‍यात जाऊन मेंदुला गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lovers husband was murderer attacked by his lover crime