ताथवडेतील दोन रस्त्यांवरून पिंपरी-चिंचवडच्या महापौर विरुद्ध महापालिका आयुक्त सामना रंगणार? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मधील दोन रस्त्यांच्या कामांवरून महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थायी समिती सभेने दोन्ही प्रस्ताव गेल्या महिन्यात दप्तरी दाखल केले आहेत.

पिंपरी : ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मधील दोन रस्त्यांच्या कामांवरून महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थायी समिती सभेने दोन्ही प्रस्ताव गेल्या महिन्यात दप्तरी दाखल केले आहेत. विशेष म्हणजे त्यावर मतदान घेण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे पत्र महापौरांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांना पाठविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत सभापतींनी दिलेल्या निर्णयावर आयुक्तांनी सरकारला दिशाभूल करणारा अहवाल दिला असल्याचे महापौरांनी पत्रात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुक्तांचे प्रस्ताव 
1) महापालिका स्थापत्य विभागाद्वारे प्रभाग 25, ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई-बंगळरूकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करण्यासाठी निविदा 17.91 टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग चार्जेससह 20 कोटी 33 लाख 25 हजार 606 रुपयात काम करून घेण्याचा विचार करणे 
2) महापालिका स्थापत्य विभागाद्वारे प्रभाग 25 मध्ये आवश्‍यकतेनुसार रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 15,41 टक्के कमी दराने निविदा प्राप्त झाली आहे. रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग चार्जेससह 30 कोटी 72 लाख 78 हजार 680 रुपयात काम करून घेण्याचा विचार करणे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थायी समितीची भूमिका 

  •  सूचक नगरसेवक शशिकांत कदम व अनुमोदक नगरसेवक अभिषेक बारणे. प्रभाग 25 ताथवडे जीवननगरकडून मुंबई-बंगळरूकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता प्रस्ताव दप्तरी दाखल करावा. मतदान होऊन नऊ विरुद्ध पाच मतांनी ठराव मंजूर. 
  •  सूचक नगरसेवक शशिकांत कदम व अनुमोदक नगरसेवक अभिषेक बारणे. प्रभाग 25 मध्ये आवश्‍यकतेनुसार रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा. मतदान होऊन 10 विरुद्ध पाच मतांनी ठराव मंजूर. 
  • महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

महापालिका स्थायी समिती सभा क्रमांक 186 ठराव क्रमांक 7376 व 7377 (ता. 27 ऑगस्ट) च्या ठरावानुसार प्रभाग 25 मधील दोन विषय नामंजूर करण्यात आले आहेत. त्याविषयीचे पत्र राज्य सरकारच्या कक्ष अधिकाऱ्यांनी 15 सप्टेंबर रोजी दिले आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी 17 सप्टेंबर रोजी पत्र पाठविले आहे. त्याद्वारे दिलेला अहवाल खोटा व दिशाभूल करणारा आहे. यावर्षी कोरोनामुळो उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहेत. उत्पन्नात घट झाली आहे. शहरातील एकूण 32 प्रभागातील विकास कामांवर मर्यादा आल्या आहेत.

अंगावर धावणारी मोकाट कुत्री अन् तळीरामांचा त्रास; सांगा उद्यानात यायचे कसे?

सर्वच प्रभागात नगरसदस्यांची विकास कामे करण्यासाठी मागणी असते. अशा परिस्थितीत एकाच प्रभागात (प्रभाग 25) शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कामे काढली आहेत. ही कामे कॉंक्रिटीकरणाची असून खर्चिक आहेत. ती डांबरीकरण करण्यास अनेक सदस्यांची सहमती होती. त्यानुसार कॉंक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरणाची फेर निविदा काढण्यात यावी, असा आदेश स्थायी समिती सभापतींनी सभेमध्ये दिला आहे. महापालिका आयुक्तांनी मात्र नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात कोणतेही कारण न देता सदर विषय दप्तरी दाखल करण्यात आल्याची खोटी माहिती देऊन सरकारची दिशाभूल केलेली आहे, असे पत्र महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 

पिंपळे गुरवचा विषय मंजूर 
महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, आयुक्तांनी आपल्याकडे पाठविलेल्या अहवालातील माहितीनुसार, स्थायी समिती कार्यपत्रिकेत विषय क्रमांक 20 नुसार कॉंक्रिटीकरण कामास 22.99 टक्के कमी दराने बहुमाताने मान्य केल्याचा उल्लेख आहे. हे काम व ताथवडेतील दोन रस्त्यांच्या कामाच्या निविदा व स्वीकारलेल्या निविदा एकाच स्वरुपाच्या आहेत. तरीही ताथवडेतील स्वीकृती दर त्या कामापेक्षा सात टक्‍क्‍यांनी जास्त आहे. त्यामुळे आयुक्तांनी सरकारला दिलेला खोटा व दिशाभूल करणारा अहवाल फेटाळण्यात यावा व स्थायी समिती सभापतींनी दिलेला निर्णय कायम करण्यात यावा. 

काय आहे पिंपळे गुरवचे काम 
पिंपळे गुरव येथील सूर्यनगरी परिसरात रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी सहा कोटी 63 लाख चार हजार 252 रुपयांमधून रॉयल्टी व मटेरियल चार्जेस वगळून सहा कोटी 56 लाख 26 हजार 559 रुपयांवर निविदा दर मागविले. हे काम 22.99 टक्के कमी दराने अर्थात रॉयल्टी व मटेरियल चार्जेसह पाच कोटी 12 लाख 16 हजार 706 रुपर्यांपर्यंत करून घेणे. त्याला नियमानुसार मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव होता. त्याला सूचक नगरसेवक अंबरनाथ कांबळे व अनुमोदक नगरसेवक झामाबाई बारणे आहेत. हा विषय 11 विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला होता. 

पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम थंडावले

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष 
पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे भाजपच्या असून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. ताथवडे प्रभाग 25 चे नेतृत्व शिवसेनेचे राहुल कलाटे, रेखा दर्शले, अश्‍विनी वाघमारे व राष्ट्रवादीचे मयूर कलाटे करीत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना दोन्ही पक्ष राज्य सरकारमध्ये दोघेही सहभागी आहेत. त्यामुळे महापौरांच्या पत्रावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner v. Mayor of Pimpri-Chinchwad from two roads in Tathawade