esakal | खासगी रुग्णालयापेक्षा कोरोना उपचारासाठी पालिका रुग्णालयेच बरी
sakal

बोलून बातमी शोधा

YCM Hospital

खासगी रुग्णालयापेक्षा कोरोना उपचारासाठी पालिका रुग्णालयेच बरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - खासगी रुग्णालयात (Private Hospital) पंधरा दिवस होतो. लाख रुपये खर्च झाले. पण, प्रकृती (Health) सुधारण्याऐवजी अधिकच खालावली. त्यामुळे महापालिका रुग्णालय (Municipal Hospital) गाठले. आठ दिवसात बरा झालो आणि डिस्चार्ज (Discharge) मिळाला. एक रुपयासुद्धा खर्च झाला नाही, असा अनुभव एका तरुणाने व्यक्त केला. अन्य रुग्णांनीही खासगीपेक्षा महापालिका रुग्णालयांमधील उपचारांबाबत (Treatment) समाधान व्यक्त केले. (Municipal hospitals are better for corona treatment than private hospitals)

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाला, तेव्हापासून महापालिका रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. चीन, दुबई आदींसह अन्य देशांत रुग्ण आढळत होते, तेव्हापासूनच शहरातील महापालिकेचे वायसीएम, जिजामाता व तालेरा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होत्या. कारण, परदेशात गेलेले शहरातील नागरिक नजीकच्या काळात परतणार होत्या. त्यांना १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यासह संसर्ग आढळल्यास उपचाराचीही तयारी महापालिका प्रशासनाने ठेवली होती. त्यावर होणारा संभाव्य खर्च लक्षात घेता ३३ टक्केच निधी खर्चाचा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी घेतला होता. अनपेक्षितपणे एकाच दिवशी परदेशातून आलेले तीन नागरिक पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावर चौदा दिवस वायसीएममध्ये उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही रुग्ण आढळत गेले. अखेर जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या २५ हजारावर पोचली.

हेही वाचा: ट्रक मोटारीच्या धडकेत डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु

महापालिका रुग्णालयांतील बेड संख्या अपुरी पडू लागल्याने खासगी रुग्णालयांना उपचाराचा परवानगी देण्यात आली. काहींच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या. मात्र, उपचाराच्या नावाखाली आर्थिक लूट खासगी रुग्णालयांत होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण सुरू केले. नियमापेक्षा अधिक बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. अद्यापही प्राप्त तक्रारीनिहाय लेखापरीक्षण सुरूच आहे. सध्या शहरातील १३७ व महापालिकेच्या वायसीएम, नवीन जिजामाता, नवीन भोसरी, तालेरा या रुग्णालयांसह दोन जम्बो रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. महापालिकेच्या अन्य पाच रुग्णालयांतर्गत तपासणी (टेस्टिंग) व लसीकरण केले जात आहे.

रुग्ण म्हणतात...

  • पुण्यातील ४२ वर्षीय योगेश म्हणाले, ‘मोशीतील खासगी रुग्णालयात दाखल झालो, तेव्हा सीटी स्कोअर पाच होता. पंधरा दिवस झाले. फरक पडत नव्हता. श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा. नातेवाइकांशी बोलून वायसीएम रुग्णालयात दाखल झालो. खासगी रुग्णालयाचे बिल एक लाख रुपये झाले होते. वायसीएममध्ये डॉक्टरांनी आयसीयूत दाखल केले. सीटी स्कोअर सोळा झाला होता. खूप घाबरून गेलो होतो. पण, डॉक्टरांनी धीर दिला. उपचार सुरू झाले. चौथ्या दिवशी बरे वाटू लागले. ऑक्सिजन बंद ठेवला. सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. एक रुपयाही खर्च आला नाही.’’

  • मोशीतील ३७ वर्षीय नीलेश म्हणाले, ‘दोन दिवस डोकेदुखी व ताप होता. घराजवळील डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी जरा बरे वाटले. पण, पुन्हा त्रास सुरू झाला. डोकेदुखी असह्य झाली. खासगी रुग्णालयामार्फत आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यासाठी एक हजार रुपये खर्च आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. ती चार हजारांची झाली. रुग्णालयात ॲडमिट झाल्यास दिवसाला किमान पाच हजार रुपये होता. त्यामुळे महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात गेलो. त्यांनी टेस्ट करून ॲडमिट केले. त्यांच्याकडीलच औषधे व इंजेक्शन दिले. उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. सुविधा व स्वच्छता चांगली आहे.’