भोसरीतील विद्युत रोहित्र स्फोटप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

इंद्रायणीनगर-भोसरी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या आजीचा बळी गेला आहे.

पिंपरी : इंद्रायणीनगर-भोसरी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या आजीचा बळी गेला आहे. यापुढे शहरात अशा घटना घडू नयेत, यासाठी महापौर उषा ढोरे यांनी महावितरण व महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. 8) बैठक बोलावली आहे. दरम्यान, त्यांनी सोमवारी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

कोतवाल कुटुंब मूळचे चऱ्होली-कोतवालवाडी येथील रहिवासी आहे. व्यवसायानिमित्त ते इंद्रायणीनगरमध्ये राहात आहेत. येथेच शनिवारी विद्युत रोहित्राचा स्फोट झाला होता. त्यात शारदा कोतवाल, त्यांची मुलगी हर्षदा काकडे व पाच महिन्यांची नात शिवण्या काकडे गंभीर जखमी झाल्या होत्या. आजी व नातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हर्षदा यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर ढोरे यांनी कोतवाल कुटुंबीयांचे त्यांच्या कोतवालवाडी येथील घरी जाऊन सांत्वन केले. महापालिकेकडून आवश्‍यक सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, इंद्रायणीनगर येथील घटनास्थळाची पाहणी केली. नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे व सामाजिक कार्यकर्ते विकास बुर्डे आदी उपस्थित होते. 

...अन्यथा आंदोलन छेडू 

भोसरी: महावितरणने नागरी वस्तीत असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळी बसवावी, तसेच कोतवाल व काकडे कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, सूरज लांडगे, विश्वनाथ टेमगिरे, संभाजी शिंदे, संतोष वरे आदींनी महावितरणच्या पदाधिकाऱ्यांना भेटून मागणीचे निवेदन दिले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal officials to meet on tuesday regarding power blast in bhosari