पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात खोपोली हद्दीत आडोशी बोगद्याजवळ तेलाचा टँकर उलटला.

लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) बोरघाटात खोपोली हद्दीत आडोशी बोगद्याजवळ तेलाचा टँकर उलटला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोणावळ्याच्या लॉकडाउनबाबत आमदार सुनील शेळके यांचे मोठे विधान

अपघातामुळे टँकरमधील तेल द्रुतगती मार्गावर पसरल्याने अपघात होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगतीवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून लोणावळ्यातून वळविण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या तेलाच्या टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर मार्गालगत दरडींना धडकत द्रुतगती मार्गावर आडवा झाला. टँकरमधून तेलाची गळती सुरू झाल्याने तेल रस्त्यावर पसरले.

एटीएम मशीन फोडण्यासाठी आले अन् ग्रामस्थांच्या तावडीत सापडले

खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक थांबविण्यात आली आहे. तर हलकी वाहने वळवण येथून लोणावळा, खंडाळा मार्गे जुन्या महामार्गावर वळविण्यात आली. तसेच मोठी अवजड वाहने थांबविण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिस, आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याने रस्ता धूत साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. मार्गावरून वाहने निसटू नये, यासाठी माती टाकण्यात येत आहे. मात्र मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanker overturns on Pune-Mumbai expressway