सोमवारपासून भरणार महापालिकेची ‘ऑनलाईन’ शाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

सरकारच्या दिक्षा अॅपसह सर्व माध्यमांचा उपयोग करुन महापालिका प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यानुसार येत्या सोमवार(ता.15)पासून महापालिकेच्या शाळेची ऑनलाईन घंटा वाजणार आहे.

पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून धडे देण्यात येणार आहेत. शिक्षक व्हिडिओ रेकॉर्ड करुन विद्यार्थी, पालकांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणार आहेत.

सध्या महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु या तीन माध्यमाच्या 105 शाळांमध्ये 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,  म्हणून ऑनलाईन शाळा भरली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडील स्मार्टफोनसह अन्य संपर्कांच्या माध्यमांचे महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. सरकारच्या दिक्षा अॅपसह सर्व माध्यमांचा उपयोग करुन महापालिका प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार येत्या सोमवार (ता.15) पासून महापालिकेच्या शाळेची ऑनलाईन घंटा वाजणार आहे. याबाबतची माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

शाळेत येवून अथवा घरुन शिक्षक अभ्यासक्रमाचा ‘व्हिडिओ’ तयार करतील. तो पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज सकाळी पाठविण्यात येईल. बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. शिक्षकांनी तयार केलेले ब्लॉक पाठविण्यात येतील. इयत्तेवाईज धडे दिले जातील. प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला मोबाईलवर व्हॉट्सअॅप, दीक्षा अॅप किंवा गुगल लिंकद्वारे धड्यांचे व्हिडीओ उपलब्ध करून देणार. त्यानंतर विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली जाईल. त्याला किती गुण पडतात. त्यावरुन त्याला समजले आहे की नाही हे लक्षात येईल. फिडबॅकही घेतले जाणार आहेत. स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. स्वयंसेवक विद्यार्थ्याच्या घरी जाणार आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. स्वयंसेवी संस्थ्यांच्या मदतीने शिक्षकांना ऑनलाईन शिकविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"या  विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 1105 शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरु करता येणार नाही.पण  विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही. याची खबरदारी घेतली आहे. ऑनलाईन शाळा घेण्याचे पूर्णपणे नियोजन केले असून सोमवारपासून ऑनलाईन शाळा सुरु होतील.
- ज्योत्स्ना शिंदे,  प्रशासन अधिकारी महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal online school start from Monday