डॉ. अमोल कोल्हे भाजपला म्हणाले, 'यह सिर्फ ट्रेलर हैं'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला कोरोना काळातील कामे व खरेदीचा उत्तर द्यावे लागेल 
  • खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा 

पिंपरी : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काळभोरनगरमध्ये घेतली. गेल्या साडेतीन वर्षांत व कोरोना काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेली खरेदी, घेतलेले निर्णय व पुढील काळात आपली भूमिका काय असेल? याचा आढावा त्यांनी घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हे यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पहिल्यांदाच घेतली. यापूर्वी त्यांनी निगडीत घेतलेली बैठक मोजक्‍याच पदाधिकाऱ्यांसमवेत होती. त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व पात्र झाले. कोरोनाकाळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पक्षाचे कार्यकर्ते रसूल सय्यद व युनूस पठाण यांचा सन्मान केला. 

पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, "रॅपिड टेस्टचा रिपोर्ट उशिरा येणे अक्षम्य बाब आहे. असा प्रकार कोरोनावाढीसाठी पोषक ठरक शकतो. यात महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. कोरोनावरील औषधांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे आली आहेत. त्यांचे पालन करावे लागणार आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्मार्ट सिटीच्या कामांचा कोरोना काळात किती उपयोग झाला. या काळात झालेली खरेदी, त्यावर घेतलेले आक्षेप तपासायला हवेत. मयताच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे करणाऱ्या माफ केले जाणार नाही. कोरोना काळात लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, रात्री-अपरात्री काढलेल्या निविदा, केलेली विकास कामे, या सगळ्यांची उत्तरे सत्ताधारी भाजपला द्यावे लागतील, असा दमही त्यांनी दिला. 

कोल्हे म्हणाले, "या पुढील काळात होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभांच्या दिवशी महापालिका आवारात किंवा विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात मी सातत्याने दिसेल. सभागृहामध्ये गैरव्यवहारांविरुद्ध आवाज उठविण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केले आहे. या विरोधाला आणखी धार चढविण्याचे काम करणार आहे. आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा आम्ही मांडणार आहोत. लोकहितांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावरसुद्धा येण्याची आमची तयारी आहे.'' राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यह सिर्फ ट्रेलर है... 

मला कोणी नेता म्हणते, कोणी अभिनेता म्हणतो. अभिनेता संपूर्ण चित्रपट सुरवातीला दाखवत नाही. आधी ट्रेलर दाखवतो. तसे आजची बैठक ही ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता हैं क्‍या! हे डॉ. अमोल कोल्हे यांचे वाक्‍य, त्यांनी शहर राष्ट्रवादीची सुत्रे हाती घेतल्याची द्योतक ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp activists meeting taken by mp dr amol kolhe in kalbhornagar pimpri chinchwad