मावळात दिवसभरात ५५ नवे पॉझिटिव्ह; रुग्णांचा आकडा पोचला दोन हजारांजवळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच असून, ती आता दोन हजाराच्या जवळपास गेली आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच असून, ती आता दोन हजाराच्या जवळपास गेली आहे. रविवारी दिवसभरात ५५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर नवलाख उंब्रे येथील कोरोनाबाधित ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ९६३ झाली आहे. आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजार ३९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५५ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३०, तळेगाव दाभाडे येथील १५, वडगाव, वराळे व वाकसई येथील प्रत्येकी दोन; तर कामशेत, माळवाडी, सुदुंबरे व काले येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ९६३ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ५१ व ग्रामीण भागातील ९१२ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ६७७, लोणावळा येथे २४६, तर वडगाव येथे रुग्ण संख्या १२८ एवढी आहे. आतापपर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ३९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी १९ जणांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या तालुक्यात सध्या ४८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३०७ जण लक्षणे असलेले व १८० जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३०७ जणांपैकी २१८ जणांमध्ये सौम्य, तर ७४ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १५ जण गंभीर आहेत. सध्या ४८७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

कौतुकास्पद : भटक्‍या कुत्र्यांसाठी 'ते' ठरतायेत अन्नदाते 

दरम्यान, शनिवारी  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मावळ तालुक्याचा दौरा करून लोणावळा, टाकवे खुर्द, कान्हे व तळेगाव दाभाडे येथील कोरोना उपचार केंद्रांना भेटी दिल्या. येथील स्थितीचा व आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

पोलिसांची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकारानुसार, वडगाव पोलिसांनी दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ६०० जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली. गेल्या पाच महिन्यात अशा प्रकारच्या एक हजार ९०० केसेस झाल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 55 corona positive in maval on 30 august 2020