स्वरसागर संगीत महोत्सव : बहारदार संतूर, सतारवादनानं रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

  • स्वरसागर संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध
  • आनंद भाटे, शाहीद परवेझखान यांना ऐकण्याचा योग 

पिंपरी : पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी यांचे संतूरवादन, सुधाकर चव्हाण यांचे गायन, पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन आणि उस्ताद शाहीद परवेझखान यांच्या सतार वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित 22 व्या स्वरसागर महोत्सवाचे. परवेझखान यांच्या सतार वादनाने महोत्सवाचा समारोप झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात महोत्सव झाला. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महोत्सवास आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सहकार्य लाभले. युवावादक निनाद अधिकारी यांच्या संतूरवादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी राग 'पूरियाकल्याण' सादर केला. 'आलाप', 'जोड', 'झाला' वाजवल्यानंतर रुपकतालात वादन केले. शंतनू देशमुखने तबला साथ केली. त्यानंतर पं. सुधाकर चव्हाण यांनी राग 'पूरियाकल्याण' सादर केला. 'आज सो बना कहे ना' असे विलंबित ख्यालाचे बोल होते. त्यानंतर 'बहुत दिन बीते' ही द्रुतलयीतील बंदिश सादर केली. 'विठ्ठला रे' या अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना प्रभाकर पांडव (संवादिनी), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीर महाराज (पखवाज), मुरलीधर पंडित (टाळ), अभयसिंह वाघचौरे व संदीप गुरव (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालगंधर्व चित्रपटातील 'चिन्मया सकल हृदया' गीताने आनंद भाटे यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी राग 'यमनकल्याण' सादर केला. 'अवगुण न कीजिए गुनीजन' असे विलंबित ख्यालाचे बोल होते. त्यानंतर 'सखी, ऐरी आली पिया बीन' ही द्रुतलयीतील बंदिश सादर केली. 'संगीत धन्य ते गायनी कळा' नाटकातील 'बागेश्री' रागातील 'दान करी रे गुरू धन अति पावन' हे नाट्यपद सादर केले. 'तिलंग' रागातील 'आता कोठे धावे मन' हा अभंग, 'माझे माहेर पंढरी' हा अभंग आणि 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा' या कन्नड अभंगाची शृंखला सादर केली. राजीव परांजपे (संवादिनी), रवींद्र यावगल (तबला), शिरीष जोशी (टाळ), आशिष रानडे व नामदेव शिंदे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महोत्सवाचा समारोप उस्ताद शाहीद परवेझखान यांच्या सतार वादनाने झाला. त्यांनी राग 'जोगेश्‍वरी'मधील 'आलाप', 'जोड', 'झाला' सादर केला. त्यानंतर राग 'खमाज' सादर केला. 'पधारो म्हारे देश'च्या सुरावटींनी त्यांनी सुरेल वादनाने सांगता केली. रात्रीच्या शांत वातावरणात पंडितजींनी सादर केलेले सतारीचे सुरेल बोल रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. मुकेश जाधव (तबला) व सिद्धार्थ गरुड (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about swarsagar music festival in pimpri chinchwad