पिंपरी-चिंचवडकरांनो आनंदाची बातमी; आता पाण्याची चिंता मिटली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

पवना धरण भरले; 2200 क्‍युसेकने विसर्ग सुरू 

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. धरणाच्या सांडव्यातून रविवारपासून (ता. 30) 2200 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. या साठी धरणाचे सर्व म्हणजे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पवना धरणातून सांडवा (दरवाजे) व विद्युत प्रकल्पातून (हॅड्रोलिक) नदीत पाणी सोडले जाते. मात्र, सध्या विद्युत प्रकल्प देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असल्याने केवळ सांडव्यातून पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध स्वरुपात उचलले जाते. तेथून जलवाहिन्यांद्वारे निगडी- प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते आणि शुद्ध केलेले पाणी शहरात वितरीत होते. 

मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

गेल्या वर्षीपेक्षा निम्मा पाऊस 

पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, यंदा 16 ऑगस्टला केवळ 74.64 टक्केच पाणीसाठा होता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, तेव्हापासून अर्थात पंधरा दिवसांत 124 मिलिमीटर पाऊस झाला आणि धरणाच्या पाणीसाठ्यात 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मेच पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते मात्र, 30 सप्टेंबर रोजी धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्यास तो पुढील वर्षी जुलै अखेरपर्यंत पुरतो. 

जलपूजनानंतर विसर्ग 

पवना धरण 98 टक्के भरले. सततच्या पावसाने शंभर टक्के पाणीसाठा होईल, या पार्श्‍वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन करून 2200 क्‍युसेकने रविवारी सकाळी विसर्ग सुरू करण्यात आला. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भारत ठाकूर, अमित कुंभार, शांताराम भोते, उमेश दहिभाते उपस्थित होते. बारणे म्हणाले, "पवना नदीपात्रालगत असणाऱ्या गावांना, शेतीलाही पवना धरणातील पाण्याचा पुरवठा होतो. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पिंपरी-चिंचवड शहराची पाणी समस्या दूर झाली आहे.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्याची वस्तुस्थिती 

गेल्या 25 नोव्हेंबरपासून शहरात सध्या समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेची जलशुद्धीकरण क्षमता 500 दशलक्ष लिटर आहे. त्यात वाढ करण्यासाठी चिखलीत 300 दशलक्ष लिटरचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील शंभर दशलक्ष लिटरच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 

असा वाढला पाणीसाठा 

 • 1 जून : 35.29 टक्के 
 • 30 ऑगस्ट : 98.00 टक्के 
 • तीन महिन्यांत वाढ : 62.71 टक्के 

धरणक्षेत्रातील पाऊस 

 • गेल्या वर्षी 30 ऑगस्ट : 3154 मिलिमीटर 
 • या वर्षी 30 ऑगस्ट : 1543 मिलिमीटर 
 • गेल्या वर्षीपेक्षा कमी : 1611 मिलिमीटर 

दृष्टिक्षेपात पाणीसाठा 

 • पवना धरणाची क्षमता : 8.51 टीएमसी (दशलक्ष घनफूट) 
 • पिंपरी-चिंचवडसाठी राखीव : 6.50 टीएमसी (दशलक्ष घनफूट) 
 • दररोज अशुद्ध जलउपसा : 490 एमएलडी (दशलक्ष लिटर) 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no anxiety for water issue to pimpri chinchwad city