esakal | रेमडेसिव्हिर नव्हे, मास्क हाच उपाय; डॉ. संदीप पाटील यांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

Mask
रेमडेसिव्हिर नव्हे, मास्क हाच उपाय; डॉ. संदीप पाटील यांचा सल्ला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - रेमडेसिव्हिर हा रामबाण उपाय नाही. कारण, यामुळे रुग्णाचा मृत्यूदर कमी होत नाही, असे दिसून आले आहे. मात्र, रुग्णाचा रुग्णालयात दाखल राहण्याचा कालावधी कमी होतो. त्याच्यातील संसर्गाचे प्रमाण कमी होऊन रुग्णाला लवकर डिस्चार्ज मिळू शकतो, इतकाच या इंजेक्शनचा फायदा आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शन कधी व कुणाला वापरायचे, हे आम्ही डॉक्टर ठरवतो. केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, म्हणून इंजेक्शनसाठी धावाधाव करू नका. ते घेण्यासाठी गर्दी करू नका. रेमडेसिव्हिर नव्हे, तर मास्क हाच प्रभावी उपाय आहे, असा सल्ला कोरोना रुग्णांवर उपचार करणारे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रूबी अल-केअर सेंटरमधील डॉ. संदीप पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

कोरोना संसर्ग अहवाल पॉझिटिव्ह आला, की अनेक जण रेमडेसिव्हिर इंजेक्शन, प्लाझ्मा, ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी धावाधाव करताना दिसतात. त्यामुळे इंजेक्शनचा काळा बाजार व काही रुग्णालयांकडून रुग्ण व नातेवाइकांकडून अधिक पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. पाटील यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सध्याचा स्ट्रेन खूपच वेगाने पसरतो आहे. पूर्वी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्याला संसर्ग होण्याचा कालावधी अर्ध्या तासांचा होता. आता ही शक्यता एक-दोन मिनिटांवर आली आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन केलेच पाहिजे. या तीन गोष्टी आपल्याला पुढील काळात नियमितपणे करायच्या आहेत. पण, नागरिक सतर्कता बाळगताना दिसत नाहीत. सध्या सर्व रुग्णालये फुल्ल आहेत. बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. अशा वेळी घाबरून जाऊ नये. संसर्ग अहवाल पॉझिटिव्ह आला, की बेडसाठी नातेवाइकांची धावाधाव सुरू होते. पण, सर्वांनाच रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. ज्यांची ऑक्सिजन पातळी ९० टक्क्यांच्या खाली येते. त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे.’’

हेही वाचा: मौजेसाठी त्यांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी

डॉक्टरांचा कानमंत्र

  • ऑक्सिजन पातळी कमी आली आणि रुग्णालयात बेड मिळत नसेल, तर रुग्णाला छातीवर झोपवून ठेवा. यामुळे रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

  • बेड मिळेपर्यंत ओ-टू कॉन्सन्ट्रेटर करा. यापासून पाच ते दहा लिटर ऑक्सिजन घरीच आपण देऊ शकतो. पाण्यापासून तो तयार होतो. केवळ त्यासाठीच्या मशिनला विजेची आवश्‍यकता असते.

  • सर्वच रुग्णांना प्लाझ्मा गरजेचा नाही. आपल्याकडे काही रुग्णांमध्ये प्लाझ्मा दिल्याचा फायदा दिसतो आहे. पण, तो कोणत्या रुग्णांना गरजेचा आहे, ते डॉक्टरांना ठरवू द्या. आग्रह धरू नका. प्लाझ्मा किंवा रेमडेसिव्हिर मिळालेच पाहिजे असे नाही.

  • केवळ ऑक्सिजनवर लक्ष ठेवा. त्यासाठी ऑक्सिमीटर जवळ असू द्या. सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजन पातळी कमी होत असल्यास डॉक्टरांना कळवा. घाबरून जाऊ नका.

  • ज्यांना कमी संसर्ग आहे, ज्यांना रोज दोन किंवा तीन लिटर ऑक्सिजन लागतो, अशांना रेमडेसिव्हिर उपयुक्त ठरलेले दिसते. त्यामुळे आम्ही त्यांना पाच दिवस डोस देतो. व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी ते फायद्याचे ठरलेले नाही.