esakal | मौजेसाठी त्यांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी

बोलून बातमी शोधा

Crime
मौजेसाठी त्यांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या ३५ दुचाकी जप्त केल्या.

संकेत आनंदा धुमाळ (वय २२, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव), श्रीकांत बाबाजी पटाडे (वय २३, रा. बोरी बुद्रूक, ता. जुन्नर), सुनील आबाजी सुक्रे (वय २६, रा. खडकवाडी, ता.आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळ चौक येथे दोघेजण चोरीची दुचाकी विकण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्या परिसरात सापळा रचला, पण चोरटे तिथे आले नाहीत. त्यातील एकजण आंबेगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी आंबेगाव येथून धुमाळ याला (ता. १४) एप्रिलला ताब्यात घेतले. त्यानंतर पटाडे यालाही ताब्यात घेतले. दोघांकडे तपास करून सुक्रे याला (ता. १५) एप्रिलला ताब्यात घेतले.

हेही वाचा: वडगाव मावळ : एकाच कंपनीतील १६१ कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह

सुनीलवर यापूर्वी तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून या चोरट्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान, आरोपींकडे कसून तपास केला असता तिन्ही चोरट्यांनी तब्बल ३५ दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अहमदपूर (लातूर), जालना, शिरपूर (धुळे), कोपरगाव, शनिशिंगणापूर (अहमदनगर), आळेफाटा, आंबेगाव, शिरूर शहर येथून ३३ लाखांच्या ३५ दुचाकी जप्त केल्या. आरोपी सुक्रे आय. आय. बी. एम. चिखली या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत होता. तसेच तो भारती विद्यापीठ कात्रज येथे गेस्ट सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणासाठी असताना, त्या परिसरातील दहा दुचाकी वाहने चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सुक्रे हा दुचाकी चोरताना मास्टर चावीचा वापर करायचा. पटाडे याच्यामार्फत गिऱ्हाईक शोधून १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दुचाकी विकायचे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो, असे सांगून काही वाहनांवर स्वतःच्या गाडीची नंबर प्लेट टाकून, पैशांची अडचण असल्याचे कारण सांगून वाहने गहाण ठेवीत असे. तसेच मिळालेले पैसे आरोपी तिघांमध्ये वाटून मौजमजा करीत होते. या कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरातील १३, पुणे शहरातील १० व पुणे ग्रामीणमधील एक असे २४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य वाहनांच्या मूळ मालकांचा पोलिस शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.