
मेट्रो प्रवाशांची संख्या रोडावली
- जयंत जाधव
पिंपरी - महापालिका निवडणुका (Municipal Election) डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत सुरू केलेल्या मेट्रोची (Metro) नव्याची नवलाई संपली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांवर गेल्या २४ दिवसांत प्रवाशांची (Passenger) संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आता खर्चाचा हा डोलारा केंद्र व राज्य दोन्ही सरकारांना सोसावा लागणार आहे.
मेट्रोच्या उद्घाटनानंतर सर्वाधिक प्रवाशांची संख्या १३ मार्च २०२२ रोजी ६७ हजारांपर्यंत गेली होती. तर; सर्वात कमी प्रवासी १९ एप्रिल रोजी ४ हजार २३५ होती. अनेकांनी ‘टूर’, ‘मनोरंजन’ म्हणून या मेट्रोचा सहकुटुंब प्रवास केला. मार्चनंतर एप्रिल महिन्यातही प्रवाशांची संख्या केवळ शनिवार-रविवारी वाढत आहे. उद्घाटनावेळी ‘ई-रिक्षा’, ‘ई-बाइक आणि सायकलीचा नुसता फार्सच ठरला. सध्या केवळ दोन स्थानकांबाहेरच बाइक आणि सायकली दिसत आहेत. मात्र, त्याही कार्यान्वित नसल्याचे दिसून येते. मेट्रो सुरू झाल्यानंतरदेखील वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी यादरम्यान स्थानकांची कामे अपूर्णच आहेत.
साधे जिने, सरकते जिने आणि लिफ्टची कामे, रंगरंगोटी, डागडुजी आदी संदर्भातील कामे अर्धवट असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मेट्रोची सुविधा चांगली आहे. मी प्रवास करतोय. मला ही व्यवस्था खूप आवडली आहे. मी फुगेवाडीत राहायला आहे. माझा जेईईचा क्लास चिंचवडला आहे, त्यामुळे मला मेट्रो उपयुक्त आहे; परंतु हे मार्ग पिंपरी ते शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रजपर्यंत होणे आवश्यक आहे. त्याचा माझ्यासारख्या विद्यार्थी, कामगार, व्यापाऱ्यांना भविष्यात उपयोग होईल.
- कुणाल गोयल, विद्यार्थी, फुगेवाडी
मेट्रोचे आर्थिक उत्पन्नाचे गणित हे सर्व मार्ग पूर्ण झाल्यावरच होते. वैयक्तिक छोट्या मार्गांवरील आर्थिक खर्च व नफा याचे गणित करता येत नाही. मेट्रोचा संपूर्ण ३३ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाल्यावर सात लाख ५० हजार प्रवासी वाहतूक होणार आहे. कुठलाही महामार्ग अथवा मेट्रोचा मार्ग असा सर्वच एकदम तयार होत नसतो. छोटे-छोटे मार्गच सुरू होतात. काही कारणांमुळे खडकी, आगा खान पॅलेस व अन्य ठिकाणी काम पूर्ण होण्यास विलंब लागला.
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, पुणे मेट्रो
प्रवासी घटण्याची कारणे
पिंपरी ते फुगेवाडीवाडी हा केवळ सहा किलोमीटरचा मार्ग
वनाज ते गरवारे महाविद्यालय हा केवळ ४.३५ किलोमीटरचा मार्ग
पिंपरी ते शिवाजीनगर असा लांब पल्ल्याचा मार्ग पूर्ण नाही
नव्याची नवलाई, पर्यटन संपले
कामासाठी, शिक्षणासाठी अद्याप पुरेसा वापर नाही
दृष्टिक्षेपात मेट्रो (दिवस ५०)
उत्पन्न - १,०५,६३,१७०
प्रवासी संख्या - १२,४५,०२३
दैनंदिन प्रवासी संख्या
पुणे - १४,५६२
पिंपरी-चिंचवड - १०,३६१
Web Title: Number Of Metro Passengers Has Decrease
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..