esakal | पंधरा वर्षांनी सुरू झाले जुनी सांगवीतील भाजी मार्केट  
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरा वर्षांनी सुरू झाले जुनी सांगवीतील भाजी मार्केट  

महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन; विक्रेत्यांसाठी 75 गाळे उपलब्ध

पंधरा वर्षांनी सुरू झाले जुनी सांगवीतील भाजी मार्केट  

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : येथील महापालिकेचे 75 गाळे असलेले राजीव गांधी भाजी मार्केट अखेर सुरू करण्यात आले. त्याचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 15) उद्‌घाटन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्‌घाटनप्रसंगी "ह' प्रभाग अध्यक्ष हर्शल ढोरे, स्थायी समिती सदस्य संतोष कांबळे, शहर सुधारणा समिती सदस्या शारदा सोनवणे, क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे आदी उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षापासून भाजी मार्केट धूळ खात पडून होते. परिणामी विक्रेत्यांकडून रस्त्यावर भाजी विक्री सुरू होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. महापालिकेचे गाळा भाडे व होणारा धंदा यामध्ये ताळमेळ बसत नव्हता, तसेच गाळेधारकांनी भाडे थकविल्याने ही मंडई बंद होती. "सकाळ'ने भाजी मार्केटबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. वाहतुकीस अडथळा येत असल्याने गेल्या वर्षापासून प्रमुख रस्त्याऐवेजी ढोरे नगर-गंगानगर या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था केली होती. दरम्यान, मार्केटचे देखभाल-दुरुस्तीचे काम मार्चआधीच अंतिम टप्प्यात होते. मात्र, लॉकडाउनमुळे किरकोळ दुरुस्ती व स्वच्छतेची कामे रखडली, ती अनलॉकमध्ये पूर्ण झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गाळे 75 अन्‌ विक्रेते 150 
सुमारे 40 विक्रेत्यांकडे जुने परवाने आहेत, तर बहुतांश विक्रेत्यांकडे परवाने नाहीत. काही विक्रेत्यांनी परवाने काढायला दिले आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यामुळे नव्या भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. उपलब्ध 75 गाळे आणि सुमारे 150 विक्रेते यांचा ताळमेळ कसा बसवणार, हा प्रश्‍न विक्रेत्यांना पडला आहे. 

विक्रेते म्हणतात... 
गणेश वाघमारे (फळ विक्रेते) : फेरीवाल्या विक्रेत्यांनी परिसरात फेरी मारून विक्री केल्यास मंडईत खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. 
मन्मथ माने (भाजी विक्रेते) : भाजी विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे व्यवसाय रुळायला वेळ जाईल. 
अण्णा काराळे (भाजी विक्रेते) : बाहेरून येणारे टेंपो, फेरीवाले यांना रोखणार कसे? अतिक्रमण विभाग प्रमुख रस्त्यांखेरीज गल्ल्यांमध्ये लक्ष देणार का? 

 
बहुसंख्यबहुल भागात त्या-त्या ठिकाणी हॉकर्स झोन करणे विचाराधीन आहे. गाळे वाटपात राहिलेल्या स्थानिक विक्रेत्यांना त्यात सामावून घेण्याचा विचार आहे. 
- संतोष कांबळे, नगरसेवक 

सद्यःस्थिती काय? 

  • गाळे : 75 
  • विक्रेते सुमारे : 150 
  • फळ विक्रेते : 10 
  • भाजी विक्रेते : 100 
  • लॉकडाउनमुळे भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली