मावळात आज तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर एकूण रुग्ण संख्या झालीय...

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

मावळ तालुक्यात रविवारी तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी तीन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८० वर, तर मृतांची संख्या चारवर पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मावळ तालुक्यातील धामणे येथील एका २७ वर्षीय महिलेचा २७ तारखेला रात्री मृत्यू झाला. या महिलेला २३ तारखेपासून श्वसनाचा त्रास होत होता. तिला मधुमेह व हृदयविकारही होता. खासगी दवाखान्यातील उपचारानंतर तिला २६ जूनला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २७ तारखेला रात्री तिचा मृत्यू झाला. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईहून तळेगाव येथे आलेल्या व २५ तारखेला मृत्यू झालेल्या ७० वर्षीय पुरुषाच्या ५९ वर्षीय भावजयीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोणावळा पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल २६ जूनला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील २१ वर्षीय होमगार्डचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील तालुक्यातील पाच जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८० वर पोचली आहे. त्यात शहरी ३० तर ग्रामीण ५० जणांचा समावेश आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३५ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडगाव पोलिसांची कारवाई

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वडगाव पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी आंदर मावळात पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी फळणे फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. पर्यटकांचे एकही वाहन टाकवे गावाच्या पुढे जाऊ दिले नाही. विना मास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध धंद्याविरुद्धही मोहीम सुरू असून चोरून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून  तडीपारीसारखी कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: over 80 corona patients in maval