Video : तीन मुलांना घेऊन दारोदार हिंडतेय, त्यात 'ती' आठ महिन्यांची गर्भवती...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

ती आठ महिन्यांची गर्भवती, उराशी दीड वर्षाचं बाळ, आणि सोबत आठ वर्षांचा मुलगा अन्‌ पंधरा वर्षांची मुलगी अशांना घेऊन ती फिरतेय दारोदारी.

पिंपरी : ती आठ महिन्यांची गर्भवती, उराशी दीड वर्षाचं बाळ, आणि सोबत आठ वर्षांचा मुलगा अन्‌ पंधरा वर्षांची मुलगी अशांना घेऊन ती फिरतेय दारोदारी. लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या केंद्रातच निवारा आणि आधार मिळाला. हळूहळू एकेक आपापल्या घरी परतले. पण तिच्या वाट्याला निवारा केंद्रच उरला. तिची अवघड स्थिती पाहता, कधी काय होईल, याचा काही नेम नाही. तिला ना पती, ना भाऊ स्वीकारत. दुसरीकडे स्थलांतरितांची संख्या कमी होऊ लागल्याने केंद्र बंद करणार आहेत. मग तीच काय, या काळजीने प्रशासन चिंतातूर झाले आहे. आता तिला गरज आहे आधार अन्‌ निवाऱ्याची. ही कर्मकहाणी आहे रेखा गोसावी यांची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेखा यांचे ( वय 38, रा. दारुंब्रे, मावळ) दोन विवाह झाले. पण, दोन्हीही अयशस्वी. त्यांना पहिल्या पतीकडून दोन मुली, एक मुलगा आहे. दुसऱ्या पतीकडून दीड वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, काही दिवसांनी पतीचे आणि तिचे पटले नाही. तिने आपल्या भावाकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिला स्वीकारण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे ती निराधार झाली. अशाच परिस्थितीत ती आकुर्डी- विठ्ठल मंदिर परिसरात बेवारस स्थितीत फिरू लागली. तिचा हा प्रवास लक्षात घेता त्या ठिकाणच्या काही नागरिकांनी या बाबतची माहिती निगडी पोलिसांना दिल्यानंतर लॉकडाउनच्या काळात तिला मुलांसह आकुर्डीतील उर्दू माध्यमिक शाळा निवारा केंद्रात आणून ठेवले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दीड महिन्यात खाण्याची, राहण्याची सोय झाली होती. पण आता परप्रांतीय, परजिल्ह्यातील नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा झाल्याने अनेक जण परतले आहेत. आता 106 पैकी 19 जणच उरले आहेत. या केंद्रात महिला कर्मचारी नाहीत, रात्रीच्यावेळी तिला काही त्रास झाल्यावर करायचं काय? ही भीती केंद्राच्या व्यवस्थापकाला सतावत आहे. प्रशासनाकडून तिच्या भावाला, पतीला संपर्क साधला, पण त्यांनी नेण्यास स्पष्ट नकार दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माणुसकी जपली

या केंद्राचे प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, राजू मानकर आणि इतर कर्मचारी पदरचे पैसे जमा करून त्यांना एक महिन्याच घरभाड्यांची तजवीज करणार आहेत. महिनाभरासाठी अन्नधान्यदेखील पुरविणार आहेत. व्यवस्थापकांकडून महिनाभर लहान मुलाला दुधाची सोय केली, पण ते एक महिन्यापुरतेच. दुसरीकडे दारुंब्रेच ग्रामपंचायत त्यांना गावात प्रवेश द्यायला तयार नाही, अशा परिस्थितीत या महिलेला कोण देईल आधार.

"आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यांना नारायणगाव या मूळगावी पाठविण्याचा. परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तोवर त्यांची अन्नाची, आर्थिक सुविधा होणे फार गरजेचे आहे. तीन मुलांची जबाबदारी आहे. ''

- राजू मानकर, आकुर्डी उर्दू शाळा निवारा केंद्र, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painful story of pregnant women pimpri chinchwad