
पिंपरी : सकाळचे प्रसन्न वातावरण...रांगोळीच्या पायघड्या, संतभेटीच्या सोहळ्याची सज्जता...ढोल-ताशा पथकांची मानवंदना, पारंपरिक वेशभूषा करून दर्शनासाठी आलेल्या महिला व चिमुकले, सकाळी सातपासूनच दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी ‘ज्ञानबा...तुकाराम’ असा एकच गजर केला. असे भारावलेले वातावरण रविवारी (ता. २०) चिंचवडगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनुभवायला मिळाले.