अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घेऊन जात होते लाखोंचा पानमसाला; मग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कंटेनरचा पाठलाग करून वडगाव मावळजवळ सुमारे ३६ लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पान मसाला जप्त केला.

वडगाव मावळ : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. ८) रात्री एका कंटेनरचा पाठलाग करून वडगाव मावळजवळ सुमारे ३६ लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पान मसाला जप्त केला. याप्रकरणी चालक व वाहकाला अटक करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गाडीच्या काचेवर अत्यावश्यक सेवा, लाईफ सेव्हर मेडिसिन, असा खोटा पास लावून हा कंटेनर द्रुतगती मार्गाने मुंबईहून पुण्याकडे चालला होता. कंटेनर चालक नारायणसिंग धनसिंग चौहाण (वय ३९, रा. बांगडी, ता. रायपूर, जि.पाली, राजस्थान) व  क्लिनर महेंद्रसिंग लक्ष्मणसिंग चौहान (वय २८, रा. सिलीया खेडा, ता. देवार, जि. अजमेर, राजस्थान ) अशी, अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक माल व वस्तूची वाहतूक तसेच, विक्रीसाठी सरकारने दिलेल्या परवानगीचा फायदा घेऊन कंटेनर (क्र. एचआर ३८, झेड ९४६१ ) केबीनच्या काचेवर अत्यावश्यक सेवा, लाईफ सेव्हर मेडिसिन, असा खोटा पास लावून त्यामधुन सरकारने प्रतिबंध केलेला तंबाखूजन्य पानमसाला द्रुतगती मार्गाने वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस अधीक्षक संदीप पाटील व पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशाप्रमाणे पथकाने सोमाटणे फाटा येथे सापळा लावला. त्यावेळी हा कंटेनर सोमाटणे फाटा येथून परत जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळ्याकडे गेल्याची माहिती पथकास मिळाली. पथकाने त्याचा पाठलाग करून वडगाव मावळ येथे त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : आता 'या' कर्मचाऱ्यांची पगार कपात

अन्न व औषध प्रशासन विभागासह त्याची पाहणी केली असता, मागील बाजूस तांदळाची पोती व पुढील बाजूस ३६ लाख रुपये किमतीची तंबाखूजन्य मसाल्याची ३० हजार पाकिटे आढळून आली.  १५ लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह ती ताब्यात घेण्यात आली. चालक व वाहकावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक घनवट यांच्यासह रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, दत्तात्रेय जगताप, प्रकाश वाघमारे, राजू पुणेकर, अक्षय नवले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. वडगाव मावळ पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panmasala worth Rs 36 lakh seized