'आम्ही फसलो, तुम्ही नका फसू!', का लावलाय चिंचवडगावात असा फलक?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

  • एल्प्रो इंटरनॅशनल शाळेविरोधात पालकांनी उभारला फलक 

पिंपरी : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पालकांच्या तक्रारीनुसार चिंचवडगावातील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलची सुनावणी लावली होती. मात्र, त्या सुनावणीला शाळा गैरहजर राहिली. परिणामी संतप्त पालकांनी "आम्ही फसलो, तुम्ही नका फसू! आमच्या मुलांचे भवितव्याचे काय?' अशा आशयाचे फलक लावून शहरात खळबळ उडवून दिली आहे. शहरात सध्या या फलकाचीच चर्चा रंगली आहे. 

शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून फंडिंग; पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचं वादग्रस्त विधान 

भारत बंदचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही पडसाद; सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सगळ्या शाळा ऑनलाइन भरत आहेत. शुल्क मात्र तेवढेच आकारले जात असल्याप्रकरणी एल्प्रो शाळेविरूद्ध पॅरेंट्‌स असोसिएशनने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार या विभागाने शाळेला सुनावणीला बोलावले होते. परंतु, शाळेने आमच्याकडे पालकांची एकही तक्रार नाही', असे सांगत सुनावणीला गैरहजेरी दर्शविली. दुसरीकडे कायद्याला न जुमानणाऱ्या शाळेविरूद्ध पालकांनी शाळेसमोर, चिंचवडगावातील अहिंसा चौक आणि दर्शन हॉलसमोर फलक लावले आहेत. "आम्ही फसलो, तुम्ही नका फसू! आमच्या मुलांचे भवितव्याचे काय?', असे प्रश्‍न शाळा व्यवस्थापनाला फलकाद्वारे उपस्थित केला आहे. याबाबत स्कूलचे समन्वयक शिवप्रसाद तिवारी म्हणाले, "पालकांनी लावलेल्या फलकाबाबत मला काहीच माहिती नाही.'' 

मणप्पूरम फायनान्सच्या पिंपरी-चिंचवडमधील सोळा शाखा बंद! 

पालक म्हणतात... 

  • शीतल शिंदे व प्रीतम बंब : या प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घालावे. पालकांना आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. 
  • उत्कर्ष वाघोलीकर व राम खेडकर : शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्याला केराची टोपली दाखवत आहे. शासनाचा कुठल्याही निर्णयाला मान्य करत नाही. 
  • इंद्रप्रकाश तिवारी व पराग देशपांडे : चार-पाच वर्षापासून पालकांची फसवणूक सुरू आहे. विनाकारण पालकांना वेठीस धरले जात आहे. 
  • मनोहर पाटील व दीपक बर्वे : अवाजवी शुल्काची मागणी करून पालक व विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. 
  • रीना भोईर : पालकांना विश्‍वासात न घेता रातोरात शाळेचे नाव बदलले आहे. शुल्क मात्र, तेवढेच मागितले जात आहे. 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents erected banner against elpro International school at chinchwadgaon