Pimpri : डिझेल दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrol disel price hike

डिझेल दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एसटी कर्मचाऱ्यांचा संप खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस डिझेलची दरवाढ होत असल्याने ट्रॅव्हल्स चालकांना तिकिटाची दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे चालक सांगत आहेत.

शहरात ५५० विविध ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. दररोज बसगाड्या खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि गोवा-कोकणासाठी रवाना होतात. तर सध्या इंदोर, अहमदाबाद, हैदराबाद, बंगलोर, सुरत अशा राज्याबाहेर ८ गाड्या आहेत. परंतु कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात सापडल्याने सध्या ७०-८० ट्रॅव्हल्स धावत आहेत.

मात्र आता एसटीचा गेल्या १६ दिवसांपासून बेमुदत संप सुरू असल्यामुळे परगावावरून परतणाऱ्या लोकांची पंचाईत झाली आहे. सर्वाधिक मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, कोल्हापूर या मार्गांवर प्रवाशांची गर्दी देखील दिसून येत आहे. मात्र तुलनेने गाड्यांची संख्या कमी आहे. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांनी परसीट १०० रुपयांनी तिकिटांचा दर वाढवला आहे.

दिवसेंदिवस डिझेलची दरवाढ होत असल्याने ट्रॅव्हल्स चालकांना तिकिटाची दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे चालक सांगत आहेत. चालक, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चामुळे तिकिटाचे दर वाढले आहेत. मात्र सध्या खान्देश, विदर्भ, मराठवाडा, नागपूर, गोवा आणि कोकणासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी वाहनांची प्रवासी ऑनलाइन ट्रॅव्हल्स बुकिंग देखील कमी झालेली आहे.

निव्वळ मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, कोल्हापूरकडे जाणारे प्रवासी मिळत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी इतर मार्गासाठी प्रवासी नसल्याने, ट्रॅव्हल्स व्यवसाय ठप्प आहे. एकूणच ३६५ दिवसांपैकी केवळ ६५ दिवसच उत्पन्न मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. पण डिसेंबर महिन्यात लग्नसराई असल्यामुळे परसीट ३०० ते ४०० वाढण्याची शक्यता आहे.

- रामा वाघमारे,

अध्यक्ष, निगडी ट्रॅव्हल्स असोसिएशन

खासगी ट्रॅव्हल्सचे दर

 1. पुणे ते मुंबई ४५० ते ५०० रुपये

 2. पुणे ते औरंगाबाद ४५० ते ५०० रुपये

 3. पुणे ते नागपूर ८०० ते ९०० रुपये

 4. पुणे ते अमरावती ८०० ते ९०० रुपये

 5. पुणे ते उस्मानाबाद ३५० ते ५०० रुपये

 6. पुणे ते लातूर ४५० ते ५०० रुपये

 7. पुणे ते बीड ३५० रुपये

 8. पुणे ते वर्धा ९०० ते १००० रुपये

 9. पुणे ते नांदेड ५०० रुपये

 10. पुणे ते धुळे ४५० ते ५०० रुपये

 11. पुणे ते कोकण ५०० रुपये

 12. पुणे ते गोवा ७०० ते ८०० रुपये

 13. पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रुपये

 14. पुणे ते इंदोर ८०० ते ९०० रुपये

 15. पुणे ते अहमदाबाद १००० ते १२०० रुपये

loading image
go to top