रुग्णांना नातेवाईक व मित्र-मैत्रिणींकडून फोनवरून दिला जातोय मानसिक आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

रुग्णांना नातेवाईक व मित्र-मैत्रिणींकडून फोनवरून दिला जातोय मानसिक आधार

पिंपरी - आज इतके रुग्ण बरे झाले, अमुक रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतलाय, शंभर वर्षे वयाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात, लसीकरणाचा खूप चांगला परिणाम होतोय, लसीकरण करून घ्या, काळजी करू नका, तपासणी करून घ्या, उपचार होऊन बरे व्हाल असे सकारात्मक मेसेज सोशल मीडियावर पाठविण्यासह फोनवरून संवाद साधत रुग्णासह त्यांचे नातेवाईक व मित्र, मैत्रिणींना या कठीण काळात मानसिक आधार दिला जात आहे.

कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णसंख्येसह मृतांचा आकडाही वाढत आहे. परिस्थिती भीषण होत चालली आहे. जवळची माणसे सोडून जात आहेत. एखाद्याच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यावर विश्वासही बसत नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. मात्र, या परिस्थितीबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांचा आणखीच धीर खचत आहे. आपले अथवा आपल्या रुग्णाचे काय होईल, या भीतीने रुग्ण व नातेवाईक अक्षरशः कोसळून जातात. दरम्यान, परिस्थिती कठीण असली तरी सकारात्मक माहितीही रुग्ण व नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवून रुग्णाला व नातेवाइकाला धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; नगरसेविकेच्या मुलाला अटक

कोरोना झालेला रुग्ण गंभीर स्थितीतूनही कसा बरा झाला, पूर्वीचे आजार व वय जास्त असतानाही कोरोनाला कसे हरविले, बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी आदी सकारात्मक गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाची माहिती घरबसल्या

इंजेक्शन, बेड अथवा ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतची माहिती देण्यासाठी अथवा त्यासंबंधीच्या मदतीसाठी प्रशासनाने एखादी माहिती प्रसारित केल्यास ती माहिती नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. यामुळे ही महत्त्वाची माहिती गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

काही मदत लागल्यास कळवा

प्रत्यक्ष भेटता येत नसले तरी रुग्ण अथवा रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून इतर नातेवाईक, मित्र, मैत्रिणी फोन करून धीर देत आहेत. सकारात्मक चर्चा केली जात आहे. वेळेवर व्यवस्थित औषधे घ्या, लवकर बरे व्हा, काहीही काळजी करू नका, काही मदत लागल्यास कळवा, असा मानसिक आधार दिला जात आहे.

चांगले प्रसंग केले जाताहेत शेअर

एखाद्या इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाला धावाधाव करावी लागते. मात्र, त्या इंजेक्शऐवजी इतरही औषधे वापरू शकतात, हे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्याबाबतची माहिती अनेक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली.

Web Title: Patients Are Given Psychological Support Over The Phone By Relatives And

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :corona patientsphone
go to top