पवना धरणसाठ्यात 17 टक्‍क्‍यांनी वाढ; धरण किती टक्के भरले वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत 212 मिलिमीटर पाऊस झाला.

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत 212 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 17.29 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. सोमवारी (ता. 24) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा एकूण पाणीसाठा 89.82 टक्के झाला. त्यामुळे पुढील वर्षासाठी पुरेसे पाणी दृष्टीक्षेपात दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तरीही दिवसाआडच... 

समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी गेल्या 25 नोव्हेंबरपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेची पाणी उचलून प्रक्रिया करण्याची साठवण क्षमता 500 दशलक्ष लिटरपर्यंतच आहे. त्यात वाढ करण्यासाठी चिखली येथे 300 दशलक्ष लिटरचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील शंभर दशलक्ष लिटरच्या प्रकल्पाचे काम गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत काम पूर्ण झाल्यास शंभर दशलक्ष लिटर जादा पाणी उपलब्ध होईल. मात्र, काम पूर्ण न झाल्यास पुढील वर्षीसुद्धा दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहू शकतो, अशी स्थिती आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पवना धरणात 30 सप्टेंबर रोजी शंभर टक्के पाणीसाठा असल्यास पुढील वर्षी 31 जुलैपर्यंत तो पुरतो. गेल्या आठ दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 17 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ होऊन धरण 72 वरून 89 टक्‍क्‍यांपर्यंत भरले आहे. शंभर टक्के धरण भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी आणखी 35 दिवसांचा कालावधी हाती आहे. दरम्यान, पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे 25 जुलैपासून धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. 

असा वाढला 'पवना'तील पाणीसाठा 

  • 17 जुलै : 72.53 टक्के 
  • 24 जुलै : 89.82 टक्के 
  • आठ दिवसांत वाढ : 17.29 टक्के 

धरणक्षेत्रातील पाऊस 

  • 17 ऑगस्टपर्यंतचा पाऊस : 1193 मिलिमीटर 
  • 24 ऑगस्टपर्यंतचा पाऊस : 1405 मिलिमीटर 
  • आठ दिवसात झालेला पाऊस : 212 मिलिमीटर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavana dam water storage 89.82 percent