esakal | पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटलांचा अधिकाऱ्यांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटलांचा अधिकाऱ्यांना दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढून महापालिका (Municipal) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी प्रशासनात ‘साफसफाई’ सुरू केली. त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशी (रविवार) आदेश काढल्याची चर्चा सोमवारी महापालिका मुख्यालय व विभागीय कार्यालयांमध्ये रंगली. दरम्यान, मर्जीतील अधिकाऱ्यांची (Officer) बदली (Transfer) रद्द करावी, यासाठी काही कारभाऱ्यांचा आटापिटा दिसून आला. सायंकाळपर्यंत अनेकजण आयुक्तांच्या भेटीच्या प्रतीक्षेत दालनाबाहेर थांबलेले होते. (PCMC Officer Transfers by Commissioner Rajesh Patil)

महापालिकेतील काही अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी तक्रारी करूनही उपयोग होत नाही, असा सूर नेहमीच प्रशासकीय वर्तुळात ऐकू येतो. त्याला आता आळा बसेल, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचारीसुद्धा मर्जीच्या विभागातच अनेक वर्षे कार्यरत आहेत. काही पदाधिकाऱ्यांचे त्यांना पाठबळ आहे. अशा कर्मचाऱ्यांची बदली कधी होणार? अशी चर्चाही सोमवारी ऐकायला मिळाली.

दरम्यान, स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, अतिक्रमण निर्मूलन, क्रीडा, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, क्षेत्रीय कार्यालये, नगररचना, पर्यावरण, आरोग्य, बीआरटी, स्मार्ट सिटी, आवास योजना आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. काही अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल केला आहे. त्यामुळे अनेकांचे दाबे दणाणले आहे.

हेही वाचा: पिंपरी : ७ वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमास साडेतीन वर्षांनी अटक

कारभाऱ्यांचे साकडे

निवडणुकीला अवघे काही महिने राहिले आहेत, त्यामुळे विकासकामे झपाट्याने करायची आहेत. नवीन अधिकाऱ्यांना नवीन काम समजून घेताना अधिक वेळ लागेल. त्याचा विकासकामांवर परिणाम होईल. ते टाळण्यासाठी ‘अमुक’ अधिकारी त्याच्या विभागात कायम ठेवा, त्याला परिसराची सर्व माहिती असल्याने बदली रद्द करा, असे साकडे काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना घातले आहे. मात्र, ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

काही अधिकाऱ्यांविषयी तक्रारी होत्या. शिवाय, एकाच विभागात अधिक वर्षे राहिल्याने कार्यक्षमता कमी होऊ शकते. हितसंबंध निर्माण होऊ शकतात. एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करणे, प्रशासनाच्यादृष्टीने चांगले असते. यामुळे त्यांचा कामाचा अनुभवही वाढतो आणि एका व्यक्तीने अनेक विभागांत काम करणे, हे सशक्त प्रशासनाचे लक्षण आहे. बदल्यांचा विकासकामांवर काहीही परिणाम होणार नाही, आहे त्याच गतीने कामे सुरू राहतील.

- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

loading image