पिंपरी शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार - श्रीरंग बारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrirang Barane

खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकार परिषद घेतली.

पिंपरी शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार - श्रीरंग बारणे

पिंपरी - आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील १ हजार चौरस फुटाच्या अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ झाला. १०० टक्के शास्तीमाफीसाठी प्रयत्नशिल आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून ते मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मावळच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे मी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लढविणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (ता. २६) पिंपरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरीच्या महिला संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, निलेश हाके, बशीर सुतार, देहूगावचे शहरप्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते.

स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करुन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री शिंदे शहरात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. आजपर्यंत पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही. पाठिशी घातले नाही. आताही चुकीची कामे रोखली जातील. शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. येत्या काही दिवसात पक्ष चिन्हाचा वाद मिटेल. चिन्हही मिळेल. २०२४ अद्याप लांब आहे. चिन्हाबाबत अधिक बोलणार नाही मात्र; मी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार

खासदार बारणे म्हणाले की, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीसाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविली जाईल. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.

टॅग्स :Pimpri Chinchwadcity