Video : चिखलीतील घरकुलमध्ये कोरोनाबाधितांना ठेवण्यास विरोध, स्थानिकांना घेतलाय हा पवित्रा 

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना महापालिकेच्या वतीने घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी : घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यास विरोध दर्शविण्यासाठी चिखली येथील घरकुलमधील नागरिकांनी शनिवारी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत मूक आंदोलन केले. 

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना महापालिकेच्या वतीने घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी तेथे दरवाजे, फॅन बसविणे यासारखी कामे सुरू आहेत. मात्र, या निर्णयास घरकुलमधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. घरकुलचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. त्यासाठी महापालिकेने आरक्षण असलेल्या अन्य ठिकाणी कोरोना रुग्णांची व्यवस्था करावी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याबाबत स्थानिक नागरिक दयानंद साठे यांनी सांगितले, "घरकुलमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. घरकुलमध्ये मध्यंतरी एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे येथील दोन महिलांना त्या जेथे काम करतात तेथे पुन्हा कामावर घेण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे आमचा विरोध आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शांताराम खुडे यांनी सांगितले, "कोरोनाग्रस्त रुग्णांना येथे ठेवल्यास शहरातील अन्य नागरिकांचा अख्खे घरकुल कोरोनाबाधित झाल्याचा समज होईल. त्यामुळे येथील नागरिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होईल. महापालिकेने दाट लोकवस्तीत अशा रुग्णांना ठेवू नये.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवृत्त कॅप्टन रघुनाथ सावंत यांनी सांगितले, "आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थानिक नागरिकांचा विचार न करता कोरोना झालेल्या रुग्णांना घरकुलच्या आवारातील चार मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. घरकुलमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक राहतात. त्यांचा विचार करायला हवा. आम्हाला घरी रहायला सांगण्यात येते. आमच्यापैकी कोणाला कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही सर्व सरकारी नियमांचे पालन करतो. त्याची महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples oppose keeping corona patients in gharkul chikhali