महापालिका शाळांचा दर्जा खालावला; शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

समितीच्या ठरावानुसार महापालिकेच्या पाच प्राथमिक शाळा खासगी संस्थेतर्फे चालविल्या जात आहेत. त्यातील विद्यार्थांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळत असून,ते स्पर्धा परीक्षांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत.

पिंपरी - खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांचा दर्जा खालावला असल्याचे शिक्षण समितीच्या पाक्षिक बैठकीत स्पष्ट झाले. शिवाय खासगी संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या महापालिकेच्या पाच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळत असून, पटसंख्या वाढत आहे. त्यामुळे या संस्थेतील शिक्षकांसमवेत महापालिका शाळांमधील शिक्षकांनी एकत्रित काम केल्यास विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा निष्कर्षही काढण्यात आला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

शिक्षण समिती सदस्या प्रियांका बारसे व सारिका सस्ते यांनी महापालिका शाळांसंदर्भात सहा प्रस्ताव मांडले. त्यावर चर्चा करताना शाळांच्या दर्जाचे वास्तव समोर आले. समितीच्या ठरावानुसार महापालिकेच्या पाच प्राथमिक शाळा खासगी संस्थेतर्फे चालविल्या जात आहेत. त्यातील विद्यार्थांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळत असून, ते स्पर्धा परीक्षांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. त्यामुळे त्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांमध्ये स्पर्धा होत आहे. शाळांचा पट खूप वाढला आहे. त्या संस्थेच्या शिक्षकांसोबत महापालिका प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एकत्रित काम केल्यास त्याचा फायदा प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना होईल. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट वाढेल. त्यामुळे संबंधित संस्था व महापालिका शाळेतील शिक्षकांनी एकत्रित काम करण्यास मान्यता द्यावी. शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होण्यासाठी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण समिती प्रयत्न करीत आहे, असेही ठरावात स्पष्ट केले आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिक्षण समितीचे निर्णय 
- ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी थेट पद्धतीने टॅब खरेदी 
- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य व वेगवेगळ्या विषयांवरील नकाशे, मॉडेल्स थेट पद्धतीने खरेदी 
- विविध स्पर्धा परीक्षा, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षांना उपयोगी पुस्तके खरेदी 
- विद्यार्थ्यांना पीटी गणवेश व स्वेटर 26 जानेवारीपर्यंत देण्यात यावेत 
- महापालिका शाळा इमारतींची दुरुस्ती, नव्याने बांधणीसह अन्य कामांच्या खर्चासाठी "शाळा स्थापत्य' लेखाशिर्ष करणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpiri chinchwad municipal schools has deteriorated as compared to private schools