Pimpri : संपामुळे साठ लाखांचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

Pimpri : संपामुळे साठ लाखांचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग आठवा दिवस असून, दिवसाला सहा ते साडेसात लाखांपर्यंत उत्पन्न कमावणारी लालपरी बंद असल्यामुळे गेल्या ८ दिवसांत वल्लभनगर आगाराचे सुमारे ६० लाखांपर्यंत नुकसान झाल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर दिवाळी हंगामात जास्त कमाई होत असते, मात्र आता हा हंगामही हातातून गेला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. यात आणखी कर्मचाऱ्यांची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी रविवारपासून पुन्हा संपावर गेले आहेत. याआधी २८ ऑक्टोबरला ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारत बस बंद पाडल्या होत्या. त्यावेळी १ ते २ दिवसांत काही मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. मात्र, दिवाळी उलटूनही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडल्यामुळे त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच ऐन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहेत. मागील ८ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

पण अजूनही तोडगा न निघाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून आगार बंद पडले आहेत. एसटीचे चाके रूतल्‍यामुळे सरासरी ६० लाख रुपयांचा फटका एसटीला बसला तर संपामुळे दररोज साडेसात लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. मागील ८ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

पुन्हा संपाची झळ

‘जीवनवाहिनी’ म्हणून एसटी ओळखली जाते. देशव्यापी लॉकडाउननंतर ‘अनलॉक’काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. एसटीला कोरोनाकाळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीचा तोटा वाढला.

loading image
go to top