esakal | Pimpri : अभियंत्याच्या घरी बाप्पांचे ‘वर्क फ्रॉम होम’
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : अभियंत्याच्या घरी बाप्पांचे ‘वर्क फ्रॉम होम’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड : कोरोनामुळे आयटी क्षेत्रात दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम चालू आहे. स्टडी टेबल ते डायनिंग टेबल साधने उपकरणांनी सजली. जमेल तसे घरच्या घरी ऑफिस थाटत दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. वाकडमध्ये राहणाऱ्या आयटी अभियंत्याने व त्याच्या पत्नीने चक्क गणरायालाच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास भाग पाडले आहे.

आयटी अभियंते आकाश बिरारी आणि शिक्षिका असणाऱ्या त्यांच्या पत्नी गायत्री बिरारी वाकडच्या पलाश सोसायटीत राहतात. हे दोघेही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. यंदाचा गणेशोत्सवाला घरात काय सजावट करायची असा प्रश्न येताच यंदा लाडक्या बाप्पालाच वर्क फ्रॉम होम करायला लावावे, असा या दापत्याचा निर्णय झाला. त्यानंतर शाडू माती शोधली, रंगाची खरेदी झाली. वेगवेगळ्या कल्पनांचे चित्र कागदावर उतरविण्यात आले अन् शेवटी बाप्पांची आधुनिक व मॉडर्न मूर्ती साकारण्यात आली.

बाप्पा आरामात मोबाईल बघताहेत, कानाला हेडफोन लावला आहे, हातात आय बॉच परिधान केलेले आहे. बाजूला ऑफिसचा लॅपटॉप, तिथेच एक पुस्तक-डायरी आहे, असा अनोखा देखावा साकारण्यात आला. देखाव्यातील मॉडर्न बाप्पा आता अभियंता भक्ताच्या घरून जणू दहा दिवस वर्क फ्रॉम होमद्वारे संपूर्ण जगावर लक्ष ठेवण्याचे काम करणार आहे, अशी ही बिरारी दामंत्याची कल्पना. उंदीरमामाही उत्सुकतेने मोबाईलकडे बघतो आहे.

कुटुंबाचा सहभाग

बिरारी कुटुंब दहा सदस्यांचे असून, मुलगी निहारिकासह सर्वांचा उत्साही सहभाग असतो. गणपती मूर्ती साकारणे आणि सजावटीच्या कामासाठी सर्वजण झटतात. आम्ही सर्व दहा दिवस आधी कामाला लागतो. प्रत्येक वर्षी इको फ्रेंडली मूर्ती घरीच तयार करतो. या वर्षी कोरोनामुळे वेगळी संकल्पना साकारण्याची कल्पना सुचली आणि यातून वर्क फ्रॉम होम करणारे बाप्पा आमच्या घरी अवतरले, असे आकाश आणि गायत्री बिरारी यांनी सांगितले.

loading image
go to top